
उमराणे | वार्ताहर | Umrane
सरकारच्या निर्णयानुसार ०२ ऑक्टोबर ते ०८ऑक्टोबर हा दारुबंदी (Alcohol) गांधी सप्ताह म्हणून महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) साजरा केला जातो. त्याअनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील विभागामार्फत बनावट दारू वाहतूक निर्मिती, गावठी दारू विक्री व वाहतूक तसेच अवैध ढाबे-हॉटेल यांच्याविरुद्ध छापे मोहीम आयोजित केली जाते.
त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department) आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या आदेशान्वये व विभागीय उपायुक्त तडवी, अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना (Police) पिंपळनेर-ताहराबाद रस्त्यावरील (Pimpalner-Tahrabad Road) मांगीतुंगी प्रवेशव्दारासमोर वाहनांची तपासणी करत असतांना एक टाटा कंपनीचे वाहन क्रमांक एम.एच.०३ सी.व्ही. १६९२ मध्ये विनापरवाना बनावट देशी दारू टॅंगो पंचचा ४० खाकी खोक्यांमध्ये लपवून ठेवलेला मद्यसाठा (Liquor Store) आढळून आला.
त्यानंतर त्याची मोजणी केली असता १८० मिली क्षमतेच्या १९२० सीलबंद देशी दारू पंच (प्रथम दर्शनी बनावट मद्य ) व चारचाकी वाहन असा एकूण ०४ लाख ८४ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. यानंतर पोलिसांनी प्रमोद अभिमन गोसावी या इसमाविरुद्ध अवैधरीत्या वाहतूक करताना आढळून आल्याने महाराष्ट्र प्रोव्हीबेशन ॲक्ट १९४९ चे कलम ६५ (अ),(ई) ८०, ८१, ८३, ९०, ९८,१०३,१०८ अन्वये गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला.
दरम्यान, ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभागाचे निरीक्षक दशरथ एल. जगताप, दुय्यम निरिक्षक हर्षराज नामदेव इंगळे, दुय्यम निरिक्षक पंढरीनाथ सदाशिव कडभाने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक वंदना देवरे, जवान दिपक गाडे, श्याम पानसरे, दिगंबर पालवी, प्रवीण अस्वले यांनी केली.