लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयीसुविधांचा अभाव

-  शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयीसुविधांचा अभाव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आशिया खंडात एक नंबर बाजार समिती, असा नाव लौकिक प्राप्त असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon APMC) शेतकऱ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधांचा मात्र अभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची (Farmers) प्रचंड गैरसोय होत असून शेतकऱ्यांना तातडीने सुविधा पुरविण्यात याव्या,अन्यथा शिवसेनेच्या (Shivsena) वतीने आंदोलन (Agitation) करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला असून याबाबत जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देण्यात आले आहे...

सध्या रब्बी हंगामातील लाल कांदा आवक मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिवस अगोदर रात्री मुक्कामी यावे लागत आहे.मात्र, छत्रपती शिवाजी महाराज कांदा बाजार आवार, कोटमगाव रोड येथे आलेल्या शेतकरी बांधवांसाठी भोजनाची कोणतीही सोय उपलब्ध नाही. विद्यतु दिवे फक्त शोभेसाठीच असून संपूर्ण बाजार समिती आवार काळोखात असतो.

त्यामुळे शेतकऱ्यांना अंधारातच वावरावे लागते. सध्या हिवाळा असून कडाक्याच्या थंडीमध्ये झोपण्यासाठी निवारा उपलब्ध नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना थंडीत कुडकुडत वाहनांच्या आश्रयाला झोपावे लागते. बाजार समिती आवारातील शौचालय बंद असून प्रात:विधी साठी उघड्यावर जावे लागते. आंघोळीसाठी कोणतीही सोय नाही. पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.

आवारातील गटारी मोठया प्रमाणात तुंबल्यामुळे सर्वत्र दुर्गधी पसरली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डास तयार झाले असून डासांमुळे शेतकरी बांधव, व्यापारी वर्ग यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी एकही सुरक्षा रक्षक व सी.सी.टीव्ही नसल्यामुळे वारंवार शेतमाल व वाहनांचे भाग चोरी होण्याच्या घटना घडत आहेत.

काही महिन्यापूर्वी तर बाजार समिती आवारातूनच नवीन ट्रॅक्टरची चोरी झाली होती. सोयींच्या अभावामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी रात्री शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यात बाजार समिती आवारातील सोयी सुविधांचा अभाव त्यांच्या निदर्शनास आला. याबाबत त्यांनी सचिव नरेंद्र वाढवणे यांच्याशी संपर्क साधत सोयी सुविधा पुरविण्याची मागणी केली.


याबाबत शेतकरी बांधव व शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री,सहकार, पणनमंत्री , पालकमंत्री, आमदार ,येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ ,पणन संचालक ,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक, लासलगाव,सचिव,कृषी उत्पन्न समिती लासलगाव यांना निवेदन पाठवून बाजार समिती प्रशासनास सूचना करून, सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

वरील मागण्यांची दखल घेऊन आठ दिवसात शेतकरी बांधवांसाठी सुविधा उपलब्ध करून न दिल्यास शिवसेनेच्यावतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा शिवसेना तालुका प्रकाश पाटील, बाळासाहेब होळकर ,कांदा व्यापारी प्रवीण कदम, केशवराव जाधव, संदीप पवार, बापूसाहेब मोकाटे, संतोष वैद्य, शिवाजी गोरे, समाधान पगार, दत्तू आहेर, दिनकर  गोरे, जालिंदर गोजरे, गोरख गोरे यांसह शेतकऱ्यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com