नाशिक । प्रतिनिधी

गत वर्षात एप्रिल - मे महिन्यात जिल्हा, मनपा प्रशासन व शहर पोलीस विभागात समन्वय नसल्यांची गंभीर बाब विविध आदेश जारी करतांना दिसून आली होती. त्याचे गंभीर परिणाम पुढच्या काही महिन्यात करोना संक्रमणातून समोर आले होते. आजही अशीच स्थिती निर्माण झाली असून प्रशासकिय यंत्रणेतील समन्वयाचा अभाव व दूरदृष्टीचे नियोजन नसल्यामुळेच दिसत आहे. मृत्यु दर कमी असण्यात धन्यता मानणार्या प्रशासनाने आता तरी समन्वयाने तातडीच्या उपाय योजना कराव्यात,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहर करोनामुक्तीसाठी तळमळीने प्रंयत्न करावेत अशी मागणी नाशिककरांकडून होतआहे.

शहरात 6 एप्रिल 2020 रोजी पहिला करोना रुग्ण आढळल्यानंतर खर्या अर्थाने करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना व आयसीएमआर यांनी जाहीर केल्यानुसार प्रतिबंधक उपाय योजना जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व शहर पोलीस आयुक्त यांनी केल्या होत्या. करोना रुग्ण राहत असलेल्या भागात गंभीर स्वरुपाची खबरदारी व पोलीस बंदोबस्तांचे काम गंभीरपणे पार पाडण्याचे काम पुढच्या काही महिन्यात झाले. मात्र उपाय योजनासंदर्भातील आदेशावरुन जिल्हा प्रशासन, मनपा व शहर पोलीस यांच्यातील असमन्वय समोर आला होता.

यातून नागरिकांत झालेल्या संभ्रमामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी करीत कामांची जबाबदारी विभागून दिली होती. असे असतांना नंतरच्या काळात बाहेर राज्य, जिल्ह्यातून आलेल्या करोना रुग्णांमुळे नाशिक शहर करोनाचे हॉटस्पॉट बनले होते. रुग्णसंख्या प्रतिदिन 800 च्या घरात गेल्यानंतर प्रतिबंधीत क्षेत्रातील गांभीर्य जाऊन केवळ फलक लावण्यापुरते काम मनपाकडून झाले आणि पोलिसांकडून बघ्याची भूमिका घेतली गेली. आता शहरात रुग्ण वाढत असतांना गेल्या आठवड्याभरात पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून जारी झालेल्या निर्बंधांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे गंभीर परिणाम समोर येऊ लागले आहे.

शहरात करोना रुग्ण समोर आल्यानंतर एका रुग्णामागे 23 व्यक्तींची तपासणी व चाचण्या करण्याचे बंधनकारक असतांना ते केले जात नाही. तसेच होम आयसोलेशनची सवलत दिली जात असली तरी संबंधीत रुग्णांची दररोज योग्य पद्धतीने तपासणी व औषधोपचार होतात का नाही याची पद्धती पाळली जात नाही.तसेच अजुनही रुग्णांच्या हातावर ठसे मारले जात नसल्याने काही होम आयसोलेशन रुग्ण बिनधास्त फिरत असल्याचे चित्र आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध लादल्यानंतर नियमाचे उल्लंंघन करणार्यांवर कारवाई करण्यास पोलीस, मनपा कर्मचारी कुणीच जबाबदारी स्वीकारताना दिसत नाही.

पोलीस यंत्रणा गाड्यामधून फेलकडे काही करताना दिसत नाही.घन कचरा व्यवस्थापकांना जास्त दंडात्मक कारवाई करा, असे सांगण्यासाठी पत्रक काढावे लागले. तर हे वास्तव असल्याने आयुक्तांना अचानक पाहणी करावी लागली. तसेच महापौरांकडून तातडीच्या उपाययोजना करण्यासदर्भात काही सुचना मनपा प्रशासनाला करण्यात आल्या. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या सर्व प्रकाराचा परिपाक आता शहरात दिसत आहे. शहरात एकीकडे नागरिक बेपवाई दाखवत असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे कुटुंबिय, नातेवाईक व मित्र परिवार धोक्यात जात आहेत. दुसरीकडे प्रशासनात समन्वय नसल्याने प्रॉपर उपाय योजना व दूरदृष्टीने उपाय योजना अंमलबजावणी होत नाही. म्हणूनच करोना संसर्गात नाशिक राज्यात एक क्रमांकावर पोहचले आहे.

करोना संसर्गात कुठे आहे आपले नाशिक

करोना संसर्गात नाशिक राज्यात 1 नंबर.

नाशिकचा सध्याचा करोना संसर्ग प्रति दिन 714.

नाशिकचा करोना बाधीत दर - 40 टक्के

मी जबाबदार योजनेकडे दुर्लक्ष