गिरणारे | Girnare

त्र्यंबक तालुक्यासह, हरसूल, पेठ आदी परिसरातून अद्यापही गिरणारेत मजुरांचा बाजार भरत आहे.

नाशिकपासून आठ ते दहा किमी अंतरावर असलेल्या गिरणारेत हा बाजार भरतो. मागील दहा बारा वर्षांपासून दिवसेंदिवस मजुरांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. पश्चिम आदिवासी पट्ट्यातील दहा हजाराहून अधिक शेतमजुरांना याठिकाणी वर्षातील ६ महिने शेतीकामांसाठी येत असतात.

विशेषतः नाशिक तालुक्यासह निफाड, सिन्नर, पिंपळगाव येथील शेतकरी स्वतःच्या वाहनांतून मजुरांना आपल्या शेतातील कामांसाठी रोज घेऊन जातात. कामे आटोपल्यावर मजुरांना गिरणारेत सोडले जाते. यामुळे आदिवासी भागातील नागरिकांना गिरणारे बाजार रोजगाराचे केंद्र ठरत आहे.

गिरणारे परिसरासह नाशिक तालुका आदी ठिकाणी टोमॅटो, द्राक्ष पिके मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकांच्या लागवडीच्या पासून ते द्राक्ष काढणीपर्यंत हजारो मजुरांना रोज मिळत आहे. अगदी पहाटे ६ वाजेपासून गिरणारेच्या मजूर बाजारात मोठ्या प्रमाणात मजूर जमा होतात. त्यात विशेषतः तरुण मुला मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात असते. प्रत्येकाला रोजगार मिळणाऱ्या या बाजारामुळे हजारो कुटुंबियांच्या चुली पेटल्या जातात.

दरम्यान या बाजारात मुली महिलांना २०० ते २५० किंवा ३०० रुपये रोज तर तरुण व पुरुषांना २५० ते ४०० रुपयांपर्यंत रोजंदारी मिळत असते. यामुळे लॉक डाऊन काळातही अनेकांना या ठिकाणी रोजगार मिळाला.

तर दिवाळीपूर्वी व दिवाळी नंतर अनेक कुटुंबे येथील शेतकऱ्यांकडे रोजंदारीवर कामाला जात असतात. महिने दोन महिने काम करून हे कुटुंब घरी परतत असते.

दरम्यान करोनामुळे फेब्रुवारीपासून ते ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत शेतीसाठी मजुर मिळणं दुरापास्त झाले होते. मात्र लॉकडाउन सरताच बाजारात मजुरांची संख्या कमालीची वाढली आहे. गावपातळीवर रोजगार देणाऱ्या मनरेंगाची उदासीनता हे मुख्य कारण असल्याचे मजुरांचे म्हणणे आहे.

दररोज हजारो मजुरांना या ठिकाणी रोजगार मिळतो. परिणामी स्थानिक व्यवसाय ही वाढत असतो. परंतु स्थानिक प्रशासनाने या मजुरांना प्राथमिक सोयी सुविधा पुरवणे आवश्यक आहे.

- किरण उदार, स्थानिक नागरिक

पावसाळा सोडला तर अन्य दिवशी गाव पातळीवर रोजगाराची कुठलीही पर्याप्त सुविधा नाही. मनरेगा कागदावरच आहे. त्यामुळे आम्हाला गिरणारे बाजार सोयीस्कर ठरतो.

- एकनाथ बेंडकोळी, मजूर