नवरात्रोत्सवात कोटमगाव देऊळ बंदच

तहसील आणि पोलीस ठाण्यातील बैठकीनंतर निर्णय
नवरात्रोत्सवात कोटमगाव देऊळ बंदच

येवला । प्रतिनिधी Yevla

करोनाची Corona दुसरी लाट ओसरल्यानंतर येवलेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नवरात्रोत्सवात यंदाही कोटमगाव येथील जगदंबामाता मंदिर Jagdamba Mata Mandir- Kotamgaon बंदचा निर्णय येथील मंदिर ट्रस्ट व प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत घेतला.

नवरात्रोत्सवात कोटमगाव येथे लाखो भाविक येतात. गेल्यावर्षी करोनाचा फैलाव वाढल्याने यात्रा रद्द करून मंदिरही कुलूप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदा यात्रा भरेल, अशी भाविकांची आशा होती. मात्र यंदाही गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नवरात्रोत्सवात कोटमगाव येथील जगदंबा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय येथील मंदिर ट्रस्ट व प्रशासनाने घेतला आहे. भाविकांनी जगदंबा मातेच्या दर्शनासाठी कोटमगाव येथे येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोटमगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत नवरात्रोत्सवात यावर्षीही मागील वर्षीप्रमाणे भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा ठराव ट्रस्टला दिला होता. तर ट्रस्टनेही याबाबत तहसीलदारांना पत्र देऊन निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार तहसील कार्यालयात तहसीलदार प्रमोद हिले यांनी यासंदर्भात काल सकाळी 11 वाजता बैठक बोलावली होती.

या बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त भाऊसाहेब आदमाने, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे व स्थानिक पत्रकार हजर होते. बैठकीत तहसीलदार हिले यांना मंदिर ट्रस्टने पत्र देत मुख्यमंत्र्यांनी मंदिर खुले ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला असून ग्रामपंचायतीने मंदिर बंद ठेवण्याचा केलेल्या ठरावानुसार हाच निर्णय योग्य असल्याचे सांगत आपल्या तालुक्यात आजही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याचे सांगितले.

आज शंभराच्या वर करोना रुग्ण असून नवरात्रोत्सवात मंदिर खुले ठेवल्यास भाविकांची गर्दी होऊन रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यातच कोटमगावची यात्रा ही राज्यभरात प्रसिद्ध असून या ठिकाणी राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर ट्रस्ट व प्रशासनाकडे नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचार्‍यांची मोठी कुमक नसल्याने मंदिर बंद ठेवणे हाच पर्याय होऊ शकतो, असे मत तहसीलदार प्रमोद हिले यांनी मांडले.

यावेळी कोटमगावात मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेडस् लावून नवरात्रोत्सवात बंद ठेवण्याचे निर्देश पत्राद्वारे शहर पोलिसांना देण्याचे आदेश यावेळी नायब तहसीलदारांनी दिले. यानंतर शहर पोलीस ठाण्यातही पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या उपस्थितीत ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com