किसान रेल वेळेत उपलब्ध करून द्यावी

द्राक्षबागायतदार संघ बैठकीत शेतकरी, व्यापार्‍यांची मागणी
किसान रेल वेळेत उपलब्ध करून द्यावी

निफाड। प्रतिनिधी Niphad

सध्या द्राक्षाचा हंगाम (Grape season) सुरू होत असल्याने कमी वेळात व कमी खर्चात येथील द्राक्षे बांगलादेशात (Bangladesh) पाठविण्यासाठी कुंदेवाडी रेल्वे स्थानकातून (Kundewadi railway station) किसान रेल (Kisan Rail) दररोज सायंकाळी 11 वाजता निघेल या बेताने दररोज वेळेवर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी

शेतकर्‍यांनी द्राक्ष बागायतदार संघाचे (Grape Growers Association) राज्य उपाध्यक्ष कैलास भोसले यांचेकडे केली असून भोसले यांनीही याबाबत व्यापार्‍यांची एकत्रित बैठक बोलावून त्यांना येणार्‍या अडचणी, द्राक्षबागायतदार संघाची भूमिका यावर सर्वकष अहवाल तयार करुन तो केंद्र शासनाकडे (Central Government) पाठवून पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन दिले.

द्राक्ष उत्पादक शेतकरी (farmers) व व्यापार्‍यांना येणार्‍या अडचणी व त्याबाबत करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी द्राक्षबागायतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष कैलास भोसले यांचे उपस्थितीत उगाव येथे नामदेव पानगव्हाणे यांचे फार्महाऊसवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित द्राक्ष व्यापार्‍यांनी आपल्या समस्या भोसले यांचेसमोर मांडल्या.

यावेळी शेतकरी व व्यापारी म्हणाले की, किसान रेल्वेद्वारे द्राक्ष पाठविण्यासाठी येणार्‍या अडचणीतील महत्वाचे म्हणजे बांगलादेशात द्राक्षमाल पाठविण्यावर तेथे सफेद द्राक्षमालास प्रति किलो 50 ते 55 रु. तर काळ्या द्राक्षमालास प्रति किलो 60 ते 65 रु. इतके शुल्क द्यावे लागते. त्यामुळे सदरचे शुल्क निम्मे करावे व सर्वच द्राक्षमालाला एकसारखे शुल्क लावले जावे.

बांगलादेशात द्राक्ष पाठविण्यासाठी द्राक्षमाल किसान रेल लोडींगचे सेंटर हे कुंदेवाडी (ता. निफाड) हे रेल्वे स्टेशन ठेवून दररोज किसान रेल्वे रात्री 11 वाजता निघून बांगलादेशाच्या मालदा बॉर्डरवरील गौरबांगा येथे 30 ते 32 तासात पोहचावी. कारण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून किसान रेल ही 36 ते 48 तास उशिराने पोहचत आहे.

यात सुधारणा अपेक्षित आहे. युरोप करीता द्राक्षमालाच्या निर्यातीसाठी प्रमोशन करण्यास जसे अनुदान (Grants) दिले जाते तसे अनुदान बांगलादेशात निर्यात होत असलेल्या द्राक्षमालाला मिळावे. किसान रेलद्वारे शेतकर्‍यांना सेवा देण्यासाठी दक्षिण रेल्वे विभागाचे वतीने विशेष रूची दाखविली जाते. मात्र त्या तुलनेत मध्य रेल्वेकडून प्रतिसाद मिळत नाही. रेल्वे प्रशासनाच्या दोन विभागातील तफावतीचा कारभार शासनाच्या निदर्शनास आणून द्यावा.

20 ते 25 बोग्यांची जी एस 10 टन क्षमतेची फॅन सुविधा असलेली किसान रेल्वे उपलब्ध करून द्यावी. किमान मार्च महिन्यापासून वातानुकूलित रेल्वे मिळावी त्यामुळे द्राक्षमालाची प्रतवारी टिकून राहिल. मालट्रकने द्राक्षमाल पाठविण्यासाठी लागणार्‍या कालावधीपेक्षा 24 तास अगोदर माल किसान रेलने बाजारपेठेत पोहचेल. शिवाय ट्रकद्वारे पाठविल्या जाणार्‍या द्राक्षमालाचे होणारे नुकसान टळेल.

साहजिक चांगल्या प्रतवारीमुळे द्राक्षमालाचे दर सुधारतील व त्याचा फायदा शेतकर्‍यांना होईल. याप्रसंगी द्राक्षबागायतदार संघाचे विभागीय संचालक रावसाहेब रायते, रामनाथ शिंदे, धनलक्ष्मी ट्रान्सपोर्टचे नामदेव पानगव्हाणे, द्राक्ष व्यापारी शितलदास सलिम बिहारी, शरिफभाई, एचक्यू राजू तांबोळी, मिन्नत भाई, मनोज भाई, गोपी गुडलक, शाबीर भाई, दाता बाबा, इम्तियाज एस डब्ल्यू एस वकिल, काला राजू आदींसह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com