Video : संजय राऊत, अनिल परबांनंतर कुणाचा नंबर? किरीट सोमय्या म्हणाले...
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भाजप (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. यावेळी सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष करत अनिल परब, संजय राऊत यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे पार्टनर रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांचा नंबर असल्याचा दावा त्यांनी केला. सोमय्या यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले...
यावेळी ते म्हणाले की, मुंबईच्या (Mumbai) जोगेश्वरी परिसरात मुंबई महापालिकेच्या खेळाच्या मैदानावर हॉटेल बांधण्याची परवानगी २०२१ साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना कशी देण्यात आली, याबाबत आपण तक्रार केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेतील सहा अभियंत्यांना समन्स बजावण्यात आले असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोगेश्वरी परिसरातील जागेबाबत सांगितले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्रालयाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते, ती चौकशी देखील अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे पार्टनर व अलिबागच्या १९ बंगल्यांच्या घोटाळ्यासंबंधित रवींद्र वायकर यांचा नंबर आता लवकरच येणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.
तसेच दिल्लीत ऑलिंपिक विजेत्या कुस्तीपटूंचे भाजप खासदाराविरुद्ध आंदोलन (Movement) सुरू आहे. त्याबद्दल किरीट सोमय्या यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) याकडे लक्ष घातले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी सुरू असून अहवाल आल्यावर योग्य कारवाई होणार, असे सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
'त्या' नराधामावर कडक कारवाई करा
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील १८ वर्षाच्या एका मुलीला संमोहित करण्यात येऊन एका २६ वर्षीय मुस्लिम तरुण ज्याचे लग्न होऊन त्याला दोन अपत्य देखील आहे. तसेच तो राजस्थान येथील एका धार्मिक स्थळात देखील घेऊन गेला होता, तिकडे त्याला तावीच देण्यात आले होते, हा गंभीर प्रकार असून लव जिहाद सारखा प्रकार असल्यामुळे पोलिसांनी त्या नराधामावर कडक कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी आज नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेऊन केली. तसेच ही घटना झाल्यावर नाशिक पोलिसांनी चांगली कामगिरी करत ४८ तासात त्या मुलाच्या मोबाईल लोकेशनवरून राज्याबाहेरून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी पहाटे ती मुलगी आपल्या परिवारात आली. मी पोलिसांच्या संपर्कात होतो. मुलगी आपल्या घरी सुखरूप आल्यानंतर आम्ही पोलिसांकडे आलो असून पीडित मुलीच्या घरी देखील जाऊन आलो, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.