निमाणी बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य

निमाणी बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य

पंचवटी | वार्ताहर | Panchavati

नाशिक महापालिकेने बससेवा सुरू केल्याने नाशिककर नव्या सीएनजी बस सेवेचा (CNG bus service) आनंद घेत आहेत. असे असले तरी दुसरीकडे एसटी महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या निमाणी बस स्थानकाची (Nimani bus stand) अजूनही वाताहत झालेली पाहायला मिळत आहे...

स्थानकात मोठमोठे खड्डे पडलेले असून, सध्या पावसाचे पाणी साचून सर्वत्र चिखल झाला आहे. यातून मार्ग काढताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. मोठा गाजावाजा करीत नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) स्वतःची परिवहन सेवा सुरू केली.

स्मार्ट सिटी अंतर्गत या बससेवेचा अंतर्भाव करण्यात आला असून, सीएनजी प्रणालीवर चालणार्‍या या बसेसची संख्या टप्प्या टप्प्याने वाढत जाणार आहे. तपोवनात (Tapovan) यासाठी मध्यवर्ती बस स्थानक (Central bus station) विकसित केले जात आहे.

बससेवेला प्रारंभ होऊन अवघे काही दिवस होत नाही तोच प्रवाशांच्या पसंतीला ही बससेवा उतरली असल्याचे बोलले जात आहे. असे असताना पंचवटीतील महत्वाचे मानले जाणारे निमाणी बस स्थानक मात्र अजूनही दुर्लक्षित राहिले आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून या बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.

बससेवा नाशिक मनपा सुरू करणार असल्याने एसटी महामंडळाने याठिकाणी रस्त्याची डागडुजी केलेली नाही. सद्यस्थितीत मनपाने बससेवा सुरू केली असल्याने, येथून शहरातील बहुतांश भागात जाणार्‍या बसेस सोडल्या जात आहेत. दिवसभर प्रवासी देखील या निमाणी बस स्थानकात ये-जा करीत असतात.

सध्या पावसामुळे येथील खडड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना येथून वाट काढणे अशक्य बनले आहे. त्यामुळे या स्थानकाची लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com