कळवण : अपहरण झालेल्या आदिवासी मुलीची पंजाब मधून सुटका

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश
कळवण : अपहरण झालेल्या आदिवासी मुलीची पंजाब मधून सुटका

कळवण । Kalwan

उंबरपाडा ता. सुरगाणा येथून अपहरण झालेल्या १२ वर्षीय आदिवासी मुलीची रहस्यमय सुटका झाली असून ती आपल्या घरी पोहचली आहे. तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या पंजाब व महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथील सोनाली गावित या आदिवासी मुलीचे (दि.०४ एप्रिल) रोजी अपहरण झाले होते. तिच्या सोबत अजून १५ मुलांचे अपहरण झाले होते. त्यांना एका ट्रकने पंजाब राज्यात नेण्यात आले होते. हा ट्रक अमृतसर भागातून एका ठिकाणी ट्रक थांबला असतांना हि मुलगी ट्रकमधून उडी मारून पळून गेली. तीची भेट एका महिलेशी झाली. त्या महिलेले सोनालीच्या पालकांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.

सोनालीची घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी शिवसेनेचे सुरगाणा तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे यांना सर्व हकीगत सांगितली.

एप्रिल महिन्यात कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सुरु असल्याने व सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने या मुलीला घेण्यासाठी सुरगाणा तालुक्यातून अमृतसर पंजाब येथे जाणे सहज शक्य नसल्याने त्यांनी कळवण विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख केशरीनाथ पाटील यांना संपर्क करून मदतीचे आवाहन केले.

पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, आमदार सुनील राऊत यांना माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोनालीला घेण्यासाठी पंजाबकडे प्रस्थान केले.

या काळात नेते मंडळीने अमृतसर येथील शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून मदत करण्यासाठी सांगितले. अमृतसर गाठल्या नंतर पंजाब शिवसेना राज्यप्रमुख शर्माजी, युवासेना प्रमुख संजीव भास्कर व यंत्रणेने त्यांना मदत केली.

शेवटी शर्तीचे प्रयत्न करून विमानाने सोनालीला मुंबईला आणण्यात महाराष्ट्र शिवसेनेच्या पदाधिकार्यांना यश आले. शेवटी (दि.१४ मे) रोजी अक्षयतृतीयेदिनी सोनाली आपल्या घरी पोहचली. यावेळी सोनाली व तिच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com