
सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
येथील वावी वेस परिसरातून गुरुवारी (दि.5) सायंकाळी 7.10 च्या सुमारास अपहरण झालेल्या 10 वर्षीय मुलगा सुखरूप घरी परतला असून रात्रीच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी स्वतः मुलाला घराजवळ आणून सोडले...
चिराग तुषार कलंत्री (12) रा. काळे वाडाशेजारी, वावी वेस सिन्नर हा बालक आपल्या मित्रांसोबत सायंकाळी काळे वाड्या समोरील मोकळ्या जागेवर खेळत असताना सफेद रंगाच्या ओमिनी कारमधून आलेल्या काही इसमांनी चिरागला ओढून गाडीत टाकत पळ काढला.
त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरडा केला असता परिसरातील नागरीकांनी ओमिनीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओमिनी सुसाट वेगाने सिन्नर नगर परिषदेसमोरून फरार झाली. त्यातील दोन इसमांनी काळ्या रंगाची पॅन्ट व डोक्यात गुलाबी रंगाची टोपी व तोंडाला काळ्या रंगाचे मास्क घातलेले होती.
यानंतर परिसरातील नागरिकांनी चिरागच्या आई-वडिलांसह समाज बांधवांनी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामुळे पोलीस ठाण्यात एकच गर्दी झाल्याचे बघायले मिळाले होते. अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगने, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनीही तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
कांगने यांच्या सूचनेनुसार जिल्हाभरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. सिन्नर पोलिसांनी आपली पथके रवाना करत त्याचा शोध सुरू केला होता. मात्र, रात्री 1.30 च्या सुमारास अपहरणकर्त्यांनी स्वःत चिरागला दुचाकीवर त्याच्या घराजवळ आणून सोडल्याने कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला.
असा घडला प्रकार
चिराग मित्रांसोबत खेळत असताना ओमिनीमधून आलेल्या 2 ते 3 जणांनी चिरागला कारमध्ये टाकून शिर्डी महामार्गाने खोपडी परिसरात नेल्याचे स्वःत चिरागने सांगितले. त्यांनतर तिथून दोघांनी चिरागच्या डोळ्याला पट्टी बांधून दुचाकीवरून बारागाव पिंप्री शिवारात नेले. तेथे जाऊन चिरागला त्यांनी पिण्यासाठी पाणी देऊन त्यास जॅकेट घालण्यास दुचाकीवर चिरागला मध्ये बसवून मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर पोस्ट ऑफिसजवळ आणून सोडले. घाबरलेल्या चिरागने घरी येत घडलेला सर्व प्रकार कथन केला.