बळीराजाचे नियोजन बिघडले; खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट

बळीराजाचे नियोजन बिघडले; खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यात यंदा पहिल्यांदा शेतकरीवर्गाने खरीप हंगामात ९८% पेरणी करून एक प्रकारे विक्रम केला आहे.

पेरणीच्या तुलनेत या पिकांना पाऊसही पोषक पडत राहिला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले. खरीप हंगाम जोरात होईल अशी आशा शेतकरी वर्गाला असताना प्रत्यक्ष पिक काढणीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मात्र बळीराजाच्या पदरी निराशा आल्याचे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.

तालुक्यात सध्या पिकांच्या सोंगणीला व काढणीला सुरुवात झाली असून भुईमूगला अतिशय कमी गळीत असल्याचे दिसून येत आहे. या पिकाचा कालावधी पूर्ण होऊनही भुईमूगाच्या शेंगा पोसलेल्या दिसत नाही. तर मूळ मोठ्याप्रमाणात सडलेले व कुजलेले दिसून येत आहे.

बागायत व जिरायत आशा दोन्ही जमिनी मध्ये मुईमूगाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. तर सोयाबिन पिकाने शेतक-यांची मोठी निराशा केली आहे. सोयाबीनचे झाड पोषक वातावरणाने फक्त वाढत राहिले. झाडाची जी गर्भधारणा व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. परिणामी उत्पादनात 30 ते 35% घट दिसून येत आहे.

चालू वर्षी उडीद व मुग या पिकांनीदेखील शेतक-यांची मोठी निराशा केली आहे. हे पिक ऐन भरात पिवळे पडून गेले. त्यामुळे उडीद व पिकाला शेंगाच आल्या नाहीत. काही ठिकाणी शेंगा आल्या मात्र, पांढ-या पडून वाळून गेल्या आहेत. वाढ होऊन पिक पिवळे पडणे हे मात्र पहिल्यादा घडल्यांचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.

तालुक्यात पिके काढणीला व सोंगणीला असतानांच परतीच्या पावसाने जोर धरल्यामुळे पिकांची नुकसान होऊ उत्पादनात घट झाली असून शेतक-यांचे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकांचीही अवस्था वेगळी नाही. भाजीपाला पिकाला वारेमाप खर्च करूनही वातावरणाचा फटका बसला आहे.

तरी कृषी विभागाने या संदर्भात संशोधन करणे आवश्यक आहे. म्हणजे पुढील हंगामातील समस्यावर मात करता येईल. त्यामुळे चालू वर्षी खरीप हंगामा शेतक-यांच्या दुष्टीने अनेक अडचणीचा ठरला असून भविष्य पुढील हंगामासाठीचे भांडवल कसे उभे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com