खानगाव उपबाजारामुळे विकासाला गती

मिरची, टोमॅटा,भाजीपाला लिलावाला प्रतिसाद
खानगाव उपबाजारामुळे विकासाला गती

निफाड । आनंदा जाधव Niphad

गेल्या काही वर्षांपूर्वी लासलगाव बाजार समितीने ( Lasalgaon APMC ) खानगाव नजिक( Khangaon Najik ) येथे द्राक्षमणी लिलाव सुरू केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मागील वर्षापासून मिरची लिलाव तर आता टोमॅटोसह भाजीपाला लिलाव सुरू केल्याने शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीची जवळची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. उपबाजार ( Khangaon Sub- APMC )आवारामुळे येथे उद्योगधंदे वाढू लागले असून परिसराच्या विकासाला गती मिळू लागली आहे.

तालुक्याच्या उत्तरेकडील सिमेवर वसलेल्या खानगाव नजिक, खडकमाळेगाव, वनसगाव, सारोळेखुर्द, सावरगाव, रानवड परिसरात द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. परिणामी परिसरातील शेतकर्‍यांना द्राक्षमणी विक्रीची जवळची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी लासलगाव बाजार समितीने गेल्या काही वर्षांपूर्वी खानगाव नजिक येथे पिंपळगाव- लासलगाव रस्त्यालगतच्या मुरमाट माळरानावर द्राक्षमणी लिलाव सुरू केले होते. त्यास शेतकरी व व्यापारी यांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला.

साहजिकच याच परिसरातील शेतकरी हिरवी मिरची पिकाला पसंती देवू लागल्याने बाजार समितीने मागील वर्षापासून येथे मिरची लिलाव सुरू केले अन् आता टोमॅटो बरोबरच पालेभाज्या व फळभाज्यांचे लिलाव सुरू केले. त्यासाठी व्यापारी बांधवांना लागणारे गाळे बांधकाम देखील चालू करण्यात येवून आवार परिसरात विजेची सोय करण्यात आली. उपबाजार आवारावर शेतमालाची वाढती आवक विचारात घेता येथे पावसाळ्यात शेतमाल विक्रीसाठी शेड बांधणे गरजेचे आहे.

तसेच शेतकरी, व्यापारी, हमाल, माथाडी यांचेसाठी पिण्याचे पाणी, निवारा, स्वच्छता गृह आदींची देखील सोय होणे गरजेचे आहे. रस्त्यालगत व शेतकर्‍यांच्या सोईने हे उपबाजार सुरू झाल्याने परिसरात दळणवळण वाढून परिसरातील गावांच्या विकासाला चालना मिळू लागली असून जवळची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतमाल वाहतूकीच्या खर्चात अन् वेळेची देखील बचत झाली आहे.

शेतकरी, व्यापारी यांचा राबता वाढल्याने परिसरात छोटे-मोठे व्यवसाय बहरू लागले असून रोजगाराचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. याच परिसरातील शेतकरी भुसार शेतमालाऐवजी भाजीपाला पिकाला सर्वाधिक पसंती देत असल्याने दिवसागणिक येथील उपबाजार आवारात भाजीपाला व टोमॅटोची आवक वाढत असून व्यापारी संख्या देखील वाढत असल्याने शेतकर्‍यांना लिलावा दरम्यान स्पर्धात्मक बाजारभाव मिळू लागले आहेत. त्यामुळे लासलगाव, पिंपळगावला जाण्याऐवजी शेतकरी घरच्या ट्रॅक्टर, पिकअप व प्रवाशी वाहनाच्या सहाय्याने शेतमाल येथे विक्रीसाठी आणू लागले असून येथील मुंजाबा फाट्यावर उभे राहत असलेले व्यापारी संकूल अन् छोटे-मोठे व्यवसाय या उपबाजारामुळे वृद्धीगत होत आहेत.

एकूणच बाजार समितीने सुरू केलेले हे उपबाजार परिसराला कलाटणी देणारे ठरत असून शेतकर्‍यांचे जीवनमान बदलण्यास देखील हातभार लावणारे ठरू लागले आहे. तर या उपबाजार आवारामुळे परिसरातील गावांना जवळची बाजारपेठ तयार झाली असून या परिसरातील शेतकर्‍यांचा इंधन खर्च वाचून वेळेची देखील बचत झाली आहे. त्यामुळे हे आवार सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

आवारात सोई-सुविधा गरजेच्या

खानगाव उपबाजार आवारात भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो. मी येथे आडत चालू केल्यानंतर माझे आडतीत 18 व्यापारी भाजीपाला खरेदी करतात. तर या उपबाजार आवारात जवळपास 50 व्यापारी असून पावसाळ्याचे दिवस बघता बाजार समितीने व्यापार्‍यांसाठी शेड बांधून दिले पाहिजेत. तसेच शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी व व्यवसायिक यांचेसाठी स्वच्छता गृहाबरोबरच पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. या आवाराला शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता हे आवार सर्वसोयींनी परिपूर्ण होणे गरजेचे आहे.

कृष्णा घोरपडे, आडतदार (खानगाव नजिक)

Related Stories

No stories found.