खैराई किल्ला
खैराई किल्ला
नाशिक

पर्यटकांना भुरळ घालणारा खैराई किल्ला..पण

पर्यटन विकासापासून वंचित!

Gokul Pawar

Gokul Pawar

हरसूल | देवचंद महाले

नाशिक जिल्ह्याला गडकोटांचे वैभव प्राप्त झाले आहे. परंतु यातील अनेक किल्ले प्रसिद्धीपासून तसेच पर्यटन विकासापासून वंचित आहेत. त्यापैकीच एक म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैराई किल्ला होय.

हरसूल पासून १६ किमी अंतरावर गुजरातच्या सीमेलगत शिवकालीन साक्ष देणारा खैराई किल्ला सध्या पर्यटकांना भुरळ घालतो आहे. हिरवीगर्द झाडी, आजूबाजूला घनदाट झाडी वेली फुलांनी घाट माथाच्या नाल्यामधून खळखळणारे झरे आल्हाददायक वातावरण व किल्याच्या पायथ्याशी असलेली कारवी कुडानी सजलेली ही खेडी लक्ष वेधून घेत आहेत.

किल्याच्या पायथ्याशी खैराई पाली, साठे पाडा, सावर पाडा, माची पाडा खरशेत, ठाणापाडा ही गावे वसली असून येथील लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या परिसरात पर्यटकांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढत असून खैराई किल्ला हा पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे. परंतु सध्या लॉक डाऊन मुळे किल्ल्यावर प्रवेश करण्यास बंदी आहे. असे असले तरी परिसर विकासापासून आहे. किल्याची उंची ही साधारण २२९६ फूट असून या ठिकाणी जुन्या तोफा असून त्यातील एक तोफ तुटलेल्या अवस्थेत आहेत. किल्यावर विविध प्रकारची फुले बहरली असून वनौषधी वनस्पती देखील आढळून येतात. किल्ल्यावरून गुजरात सीमा परिसर, पेठ- जव्हार परिसर त्र्यंबकेश्वर सह्याद्री पर्वत रांग दृष्टीस पडतो. या किल्ल्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली असून सुरतेच्या लुटीनंतर छत्रपती शिवरायांनी हा किल्ला काबीज करून पुढे जव्हार मार्गे गेल्याचे सांगण्यात येते.

यामुळे हा परिसर पर्यटन विकासाच्या अंतर्गत विकसित व्हावा अशी स्थानिक नागरिकांसह पर्यटन प्रेमींची मागणी आहे. यासाठी स्थानिक तरुण व ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन, आमदार खोसकर यांना याबाबत निवेदन दिले आहे. या परिसरास पर्यटन विकास निधी उपल्बध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हा वैभवशाली किल्ला असून येथील सृष्टी सौंदर्य असल्याने हा परिसर विकासापासून वंचित आहे. पर्यटन वृद्धी व्हावी यासाठी किल्याला पुनरवैभव प्राप्त व्हावे तसेच स्थानिक तरुणांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.

- अनिल बोरसे, ग्रामस्थ

Deshdoot
www.deshdoot.com