
कळवण । प्रतिनिधी kalwan
चणकापूर धरण ( Chankapur Dam )व त्या धरण लाभ क्षेत्राखाली असलेल्या नागरिकांच्या जीवाचा विचार करूनच वीजपुरवठा खंडित करणे अपेक्षित होते. मात्र फक्त अडीच लाख रुपये वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित( Power supply ) करून अडीचलाख नागरिकांचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित करून महावितरण कंपनीच्या अधिकार्यांना केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार ( Dr. Bharti Pawar )यांनी धारेवर धरले. व तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या.
केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील शासकीय खातेप्रमुखांची आढावा बैठक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. या आढावा बैठकीत साकोरे येथील शेतकर्यांनी महावितरण कंपनीकडून रोहित्र मिळत नसल्याची तक्रारी केल्या. नंतर चणकापूर धरणावरील वीजपुरवठा अडीच लाख रुपये थकबाकी वसुलीसाठी मनमानी करीत खंडित केला असल्याचे समोर आले.
सध्या पावसाळा सुरु झाल्याने धरण एका मोठ्या पावसात भरण्याची शक्यता असल्याने अचानक धरणातील पाणी सोडण्यासाठी दरवाजे उडण्यासाठी विजेची गरज भासेल त्यावेळी वीजपुरवठा खंडित असल्याने दरवाजे उघडायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाल्याने अडीच लाख वसुलीसाठी किती नागरिकांचा जीव धोक्यात येईल याची कल्पना तरी आहे का असा प्रश्न महावितरण कंपनीच्या अधिकार्यांना करीत धारेवर धरले.
आपत्कालीन उपाययोजना म्हणून तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना डॉ. पवार यांनी महावितरण कंपनीच्या अधिकार्यांना केल्या. बांधकाम विभागाचा आढावा घेताना तालुक्यातील रस्त्यांची पहिल्याच पावसात वाट लागल्याने त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी तसेच नवीन रस्त्यांची निर्मिती करताना दर्जा बाबत काळजी घ्यावी असे सांगितले यावेळी पंचायत समिती प्रधानमंत्री आवास योजनासह सर्वच विभागाची माहिती घेतली. यावेळी सर्वच विभागांशी संपर्क साधतांना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आसल्याने प्रत्येक विभागाने तक्रार निवारण केंद्र सुरु करावे व नागरिकांना हेल्पलाईन नंब प्रसिद्धी माध्यमांकडून जाहीर करावा व नागरीकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे अशा सूचना केल्यात.
या आढावा बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बंडू कापसे, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, सुधाकर पगार, युवामोर्चा तालुकाध्यक्ष हितेंद्र पगार, चेतन निकुंभ, हेमंत रावले, प्रविण रौंदळ, रुपेश शिरोडे, एस के पगार, दादा मोरे, सुनील खैरनार यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
आदिवासींचे आरोग्यही धोक्यात
आरोग्य विभागाचा आढावा घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या प्रसूती बाबत माहिती घेतली. यात नोंदणी असलेल्या गरोदर माता किती? व प्रसूती झालेल्या माता किती? तसेच खागजी दवाखान्यात गेलेल्या व प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपजिल्हा रुग्णालय व नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठवलेल्या रुग्णांची माहिती घेतली. यात खाजगी रुग्णालयात गेलेल्या रुग्णांची करणे विचारली असता तालुका वैद्यकीय अधिकार्यांची उत्तरे देताना तारांबळ उडाली. या सर्व रुग्णांची चौकशी करून पुढच्या आढावा बैठकीत करणे सादर करण्याचे आदेश दिले.
शाळेसाठी उपक्रम राबवा
शिक्षण विभागाचा आढावा घेत असतांना गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या धनोली या आदिवासी गावात 1 ली ते 4 थी पर्यंत चार वर्ग असलेल्या शाळेत 58 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या सर्व विद्यार्थ्यांमागे एकच शिक्षक आहे. ह्या शिक्षकाला शाळाबाह्य काम असल्यास त्या दिवशी शाळा बंद राहत असल्याने येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ शिक्षक द्यावा अशी मागणी होत आहे. शिक्षण विस्तार अधिकारी डी ए पवार यांनी माहिती देताना 68 रिक्त असल्याची माहिती दिली. जिल्हा कार्यालयाकडे शिक्षक मागणी करण्यात आली आहे असे सांगितले. त्यावेळी राज्यमंत्री डॉ. पवार यांनी शिक्षक मिळेल तेव्हा मिळेल नवीन शिक्षकांची वाट न पाहता विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी डिजिटल शिक्षणाची व्यवस्था करावी किंवा एक दिवस शाळेसाठी उपक्रम राबवून तालुक्यातील शिक्षक, अधिकारी, इतर शिक्षित नागरिकांची मदत घ्यावी अशा सूचना केल्या.