कळवण : दळवट परिसरात भूकंपाचे धक्के

भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंप मापन यंत्र बसवावे, आ. नितीन पवार यांची मागणी
कळवण : दळवट परिसरात भूकंपाचे धक्के

कळवण । प्रतिनिधी

भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवट परिसरातील बिलवाडी, देवळीवणी, चिचंपाडा, बोरदैवत, जामलेवणी आदी भागात गेल्या शनिवारी 28 नोव्हेंबर रात्री 4 व रविवारी 29 नोव्हेंबर सकाळी 3 लहान व मोठे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहे.

विशेष म्हणजे आज रविवारी सकाळी 10.45 मि. आमदार नितीन पवार हे बिलवाडी येथे आदिवासी बांधवाना भेटण्यासाठी व भूकंपाची माहिती घेण्यासाठी आले असता त्यांनी सौम्य भूकंपाच्या धक्क्याचा अनुभव घेतला. शनिवारी रात्री तहसीलदार बी ए कापसे व अभोण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन दिलासा दिला. या धक्क्यामुळे या भागातील आदीवासीबांधवानी शनिवारची रात्र घराबाहेर जागून काढली.

भूकंपाचे धक्के जाणवू लागताच पंचायत समितीचे माजी सभापती जगन साबळे,बिलवाडीचे सरपंच लक्ष्मण गायकवाड, जामलेवणीचे मनोहर ठाकरे, देवळीवणीचे माजी सरपंच कृष्णा चव्हाण यांनी आमदार नितीन पवार यांना माहिती दिली.

दरम्यान आज रविवारी सकाळी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, पंचायत समितीचे माजी सभापती जगन साबळे, बाजार समितीचे संचालक डी.एमगायकवाड,राजू पाटील, युवराज चव्हाण,मनोहर ठाकरे,कृष्णा चव्हाण,सोनीराम गांगुर्डे यांनी भुकंपप्रवण क्षेत्रातील भुकंपाचे धक्के बसलेल्या गावांना भेटी देऊन अधिक माहिती जाणून घेत भयभीत झालेल्या आदीवासी बांधवांना दिलासा दिला.

भूकंप प्रवण क्षेत्रात शासनस्तरावरुन उपाययोजना करुन दिलासा द्यावा अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी केली असून याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली.

शासनाने भूकंपप्रवण क्षेत्र भागात उपाययोजना करणे गरजेचे असून परिसर आदिवासी असल्याने शासनाचे लक्ष केंद्रित करून विविध सुविधा पुरवाव्यात अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य जगन साबळे व बिलवाडी, देवळीवणी,खिराड,मोहपाडा,पळसदर येथील आदीवासी महिला व बांधवांनी यावेळी आमदार नितीन पवार यांच्याकडे केली. याप्रश्नी शासन दुर्लक्ष करीत असल्याने या परिसरात कायमस्वरुपी भूकंपमापन यंत्र बसून तत्काळ आणि प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी या भागातील आदीवासी बांधवांची आहे.

बिलवाडी,बोरदैवत, देवळीवणी,चिचंपाडा व जामलेवणी, देवळीकराड,खिराड येथील आदीवासी नागरिकांनी रात्र घराबाहेर जागून काढली, भूकंपाचे धक्के त्यात वाढलेल्या थंडीमुळे शेकोटीचा आसरा घेऊन ग्रामस्थांनी रात्र घराबाहेर काढली.शनिवारी रात्री 8:24, 8:35, 9:12, 10 वाजता तर रविवारी सकाळी 7:47, 10:10, 10:30, 10:45 परिसरात भूकंपाचे धक्के बसले.

शनिवारी रात्री व रविवारी सकाळीस वीजतारा झोक्यासारख्या हालत होत्या.झाडे हलली, वीजेचे पोल हालत होते,घरातील भांडे पडली, पत्र्यांचे असलेली घरांना हादरे जाणवली त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पंचायत समितीचे माजी सभापती जगन साबळे यांनी सांगितले.भूकंपाच्या ह्या जोराच्या धक्क्यामुळे आदिवासी बांधव भयभयीत झाले असून कुठलेही नुकसान झाले नसल्याचे यावेळी सांगितले,

आता तरी लक्ष द्या -

बिलवाडी, बोरदैवत ,देवळीवणी ,चिंचपाडा ,खिराड आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसले, या भागात भ्रमणध्वनी कंपनीची सेवा सुरळीत मिळत नाही त्यामुळे येथून कुठेही संपर्क होत नाही ,काही माहिती द्यायची तर बाहेर जावून भ्रमणध्वनी करावा लागतो ,अशा परिस्थितीत काही अघटीत घडले तर आम्ही करायचे काय ,काही झाले तेव्हा शासनाला जाग येईल काय ?असा संतप्त सवाल या भागातील आदिवासी बांधवांनी केला आहे .

यंत्रणा कार्यान्वित करा -

बिलवाडी, देवळीवणी, चिचंपाडा, बोरदैवत, जामले वणी ,देवळीकराड ,खिराड आदी भागात दोन दिवसापासून भूकंपाचे धक्के बसत आहे.परंतु धक्का किती बसला. हे काही समजत नाही, भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंप मापन यंत्र शासनाने बसवावे त्यामुळे भूकंप धक्का किती रिश्टरचा होता व त्याची तीव्रता लक्षात येईल तरी यंत्रणा कार्यान्वित करा

-आमदार नितीन पवार कळवण

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com