कालिका यात्रा रद्द; कोट्यवधीचे नुकसान

कालिका यात्रा रद्द; कोट्यवधीचे नुकसान

नवीन नाशिक । New Nashik (प्रतिनिधी)

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेची दरवर्षी प्रमाणे होणारी नवरात्रातील यात्रा तब्बल 102 वर्षांनंतर करोनामुळे रद्द करण्यात आली असल्याची माहिती संस्थानाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक केशवराव पाटील यांनी दिली.

नवरात्र काळात नाशिकमध्ये होणारी कालिका देवस्थानची ही सर्वात मोठी यात्रा रद्द झाल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाविकांच्या भावनांचा विचार करून यंदा सर्व धार्मिक विधी हे ऑनलाईन पद्धतीने दाखविण्यात येणार आहे.

नवरात्रात घटस्थापनेपासून सर्वच धार्मिक विधी विधिवत नियमांचे पालन करून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ही यात्रा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू असते.

या यात्रेत विविध प्रकाराचे दुकाने, खेळणीचे दुकाने असे थाटले जात असतात. नाशिकमधीलच नव्हे तर देशातील विविध भागातून व्यापारी या यात्रेत सहभागी होऊन आपली रोजरोटी कमवत असतात. यंदा मात्र करोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

यात्रा रद्द होणार असली तरी घटस्थापनेपासून सर्वच धार्मिक विधी दरवर्षीप्रमाणे होणार आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात येणार आहे. या सर्व धार्मिक विधींचे व पूजेचे ऑनलाईन दर्शन भाविकांना करता येणार आहे.

कालिका मातेच्या मंदिराच्या परिसराला विद्युत रोषणाई करण्यात येणार असून देवीला साजश्रृंगार करण्याबरोबरच फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. मंदिरातील धार्मिक विधी करताना शासनाच्या सर्वच नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com