कळमबारी सरपंच, ग्रामसेवक कामकाजाची होणार चौकशी

कळमबारी सरपंच, ग्रामसेवक कामकाजाची होणार चौकशी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पेठ तालुक्यातील कळमबारी ग्रामपंचायतीतील सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून चुकीचे कामकाज सुरू असल्याची तक्रार ग्रामपंचायतींच्या सदस्या राधाबाई राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्याकडे केली. यावर परदेशी यांनी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी दगडू राठोड यांची समिती नियुक्ती करून तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहे.

ग्रामपंचायत सदस्या राऊत यांसह, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शामराव गावित, महेश राऊत. किरण भुसारे, गोपाल देशमुख, रईस शेख,मनोज गजबार या शिष्टमंडळाने बुधवारी (दि.18) परदेशी यांची भेट घेतली. यात ग्रामपंचायतींच्या कामकाजाबाबत तक्रार करण्यात आली. सरपंच नंदिनी गोपाळ शेवरे ग्रामपंचायतींच्या कोणत्याही सभांना उपस्थित नसतात.

सरपंचाच्या गैरहजरीत त्यांच्या पतीच्या ग्रामपंचायतींच्या कामकाजात हस्तक्षेप करत कामकाज करतात. विकासकामे व निधी वितरण हा कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने सरपंच यांचे पती व ग्रामसेवक संगनमताने खर्च करतात.

गावात 23 शौचालयाचे अनुदान दोघांनी मिळून लाटले. शौचालये नसताना, निधी काढून घेतला. सौरदीप चोरी, घरकुल यादीत फेरफार, विहीर दुरूस्ती, सिमेंट रस्ता काँक्रिटीकरण, स्मशानभूमीचे निकृष्ट बांधकाम, स्वयंरोजगार कामाची चौकशी व आर्थिक व्यवहारात अफरातफर, ग्रामपंचायतीतील खुर्च्या, टेबल खरेदी, शबरी घुरकुल यादी, वृक्ष लागवड आदी कामाची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिष्टमंडाळाने याबाबतचे पुरावे देखील यावेळी सादर केले. उपमुख्यकार्यकारी अधिकारी परदेशी यांनी तक्रारींची दखल घेऊन तत्काळ चौकशीचे आदेश यावेळी दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com