नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

शहर तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीमध्ये 18 वर्षाखालील मुलांचा वाढता सहभाग चिंताजणक ठरत आहे. यंदा 68 गुन्ह्यांमध्ये बालकांचा सहभाग आढळून आला आहे. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 76 ने कमी राहिल्याचेही वास्तव आहे. हा करोना लॉकडाऊनचा परिणाम असल्याचेही मानले जात आहे.

अल्पवयीन गुन्हेगारीमागे कौटुंबिक पार्श्वभूमी अनेकदा कारणीभूत ठरते. कुटुंबात जर संवाद तुटलेला असेल तर त्याचाही बालमनावर परिणाम होत असतो. सभोवतालच्या परिसरातील सार्वजनिक वर्तनामुळेही अनेकदा बालगुन्हेगारीला निमंत्रण मिळत असते. भौतिक गरजा, चंगळवादाचे आकर्षणापोटीदेखील बालके गुन्हेगारीकडे वळतात.

पालकांकडून निर्बंध नक्कीच असले पाहिजे;मात्र त्यासाठी एखाद्या गुन्हेगारासारखी हिंसक शिक्षा देणे हेदेखील मुलांना गुन्हेगारीकडे जाण्यात प्रवृत्त करणारे ठरत असल्याचे मानसपोचार तज्ज्ञ सांगतात.

यासह कमी वयात हातात पडलेला सोशल मिडिया, मोबाईल, गुंडगिरीतून राजकारणात गेलेल्यांचा आदर्श, अजानतेपणी इतरांकडून गुन्ह्यात होणारा वापर अशा विविध कारणांतून शहरातील गुन्हेगारीत 18 वर्षाखालील युवकांचा सहभाग वाढत आहे.

2020 या वर्षभरात शस्रसंबंधीच्या गुन्ह्यात दोन अल्पवयीन तर हाणामार्यांच्या गुन्ह्यात 11, अत्याचाराच्या गुन्ह्यात 1 आणि चोरीच्या गुन्ह्यात 31अल्पवयील मुलांचा समावेश आढळून आला आहे. एकूणच यावरून अल्पवयीन मुले हाणामार्यांसह चोरीच्या गुन्ह्यांकडे अधिक वळाल्याचे दिसून येते.

मागील वर्षी हाणामार्यांसह चोरी आणि अत्याचार्याच्या गुन्ह्यांत बालगुन्हेगारांचा सहभाग अधिक राहिला होता. यावर्षी विधिसंघर्षित बालकांवर सर्वाधिक अंबडमध्ये 10, पंचवटी, मुंबई नाका पोलीस ठाण्यात प्रत्येकी 9 गुन्हे दाखल आहेत. गेल्यावर्षी या तीनही पोलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यांचे प्रमाण अधिक होते.

या बालकांकडून पुन्हा गुन्हेगारीच्या घटना घडू नये, यासाठी बालकांची काळजी, संरक्षणासाठी कायद्यातील तरतुदींचा वापर कारून विधिसंघर्षित बालकांबाबत निर्णय घेतले जातात. बालगुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता सरकारी यंत्रणा प्रयत्न करते.

नवीन तरतुदीनुसार गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात विधिसंघर्षित बालकांचा सहभाग आढळून आल्यास 16वर्षे वयाच्या पुढील बालगुन्हेगारांना सज्ञान समजून खटला चालविला जातो. यामुळे पळवाटा बंद झाल्याने त्यांच्यावर खटले दाखल होत आहेत

दोन वर्षातील गुन्हे

गुन्हे वर्ष संख्या

प्रकार 2019 2020

खून 2 3

शस्रसंबंदी 1 2

मारामारी 19 11

अत्याचार 5 3

चोरी 93 31

इतर 24 18

एकुण 144 68