
नाशिक । Nashik
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 मध्ये देशातील दहा स्वच्छ शहरात येण्याची मोठी तयारी नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडुन केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जुन्या बांधकामाचा रोडाराड शहरात कोठेही टाकला जाऊ नये म्हणुन मनपाकडुन कार्यवाही केली जात असतांनाच आता शहरातील बंदी असलेल्या प्लॉस्टिकचा वापर रोकण्यासाठी आता महापालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्तविद्यमाने छापे टाकले जाऊन कडक कारवाई करण्याची तयारी करण्यात आली आहे.
नाशिक शहराचा मागील वर्षात देशातील स्वच्छ शहरात अकरावा आणि राज्यात दुसरा क्रमांक आला होता. या दरम्यान प्रशासनाकडुन मागील वर्षात राहिलेल्या त्रुटी दूर करुन आता स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 या वर्षात पहिल्या दहा क्रमांकात येण्याची जोरदार तयारी महापालिका प्रशासनाकडुन केली जात आहे.
यात सर्वात प्रथम शहरातील जुन्या बांधकामाचा रोडाराड (डेब्रीज) रस्त्यालगत मोकळ्या जागेत टाकला जात, तसेच अशा साहित्यांचे व्यवस्थापन केले जात नसल्याने यामुळेच नाशिकला कमी गुण मिळाले होते. आता आयुक्त कैलास जाधव यांनी स्वत: लक्ष घालत बांधकामाच्या रोडाराडचे व्यवस्थापन होण्यासाठी प्रकल्प उभारणीचे काम हातील घेतले आहे.
तसेच बांधकाम व्यावसायिक व नागरिकांना जुन्या बांधकामाचा राडारोड उचलून देण्यासाठी ठराविक शुल्क आकारत याकरिता विभागीय कार्यालय स्वरावर व्यवस्था केली असुन हे डेब्रीज कोठेही टाकण्यावर कारवाई सुरू केली आहे. यात सर्व्हिस चार्ज व दंडाच्या माध्यमातून 2 लाख 20 हजाराच्यावर दंड वसुल केला आहे. आता प्रशासनाने बंदी असलेल्या प्लॉस्टीक वापरवर लक्ष केंद्रीत केले आहे.
बंदी प्लॉस्टिक वापर कायम स्वरुपी बंद करण्यासाठी आत्तातर्यत मनपा प्रशासनाकडुन एप्रिल ते 26 नोव्हेंबर या कालावधीत 56 केेसेस करुन 2 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. अजुनही शहरात सिंगल युज प्लॉस्टिक वापरण्याऐवजी बंदी असलेले प्लॉस्टीकचा वापर जोरात सुरू आहे.
यामुळेच आता महापालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळांकडुन संयुक्त बंदी प्लॉस्टिक वापराविरुध्द मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात शहरातील बंदी प्लॉस्टिकची विक्री करणार्या दुकानावर छापे घालुन कारवाई केली जाणार आहे.
तसेच आता बंदी प्लॉस्टीकचे उत्पादन करणार्या कारखान्यावर छापे घालण्यात येणार असुन मुळावर घाव घालण्याची तयारी आता महापालिकेकडुन करण्यात आली असुन ही कारवाई लवकरच केली जाणार आहे.