
नवीन नाशिक । प्रतिनिधी
माऊली लॉन्स येथून केवल पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुकृपा बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या घरफोडीत २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एक किलो चांदी असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौज फाटा दाखल होत सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिताराम श्यामलाल शर्मा (५९) यांच्या मालकीचा केवल पार्क रोडवर गुरुकृपा बंगला आहे.ते बाहेरगावी गेले असताना रविवारी (दि. ९) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चारचाकी तुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तसेच सेफ्टी दरवाजा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटात असलेल्या सोन्याच्या बांगड्या चैन अंगठी मंगळसूत्र असे २५ ते २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच एक किलो वजनाचे चांदीचे विविध दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेला आहे.
रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शर्मा यांच्या घरात काम करणारी महिला आल्याने त्यांनी हा प्रकार बघितला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घरफोडीचा पंचनामा करून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सदर घरफोडी करणारे चोरटे हे चारचाकी कारमधून आल्याचे सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे पथक दाखल होत सीसीटीव्हीच्या द्वारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.