उपचारासाठी ‘जीवनदायी’ची सोय

उपचारासाठी ‘जीवनदायी’ची सोय

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोना बाधितांची वाढती संख्या चिंता निर्माण करणारी आहे. उपचाराबाबत रूग्णांची गैरसोय होवू नये यास्तव म. ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या सात रूग्णालयांमध्ये बाधीत रूग्णांवर शासन निर्णयानुसार उपचार सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बाधीत रूग्णांना या रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होत शासन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त दीपक कासार यांनी केले.

आयुक्त दालनात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त कासार बोलत होते. उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी आदी यावेळी उपस्थित होते. शहरातील सामान्य रूग्णालय, प्रयास हॉस्पिटल, सिक्स सिग्मा हॉस्पिटल सटाणारोड, समर्थ हॉस्पिटल जनलक्ष्मी बँकेजवळ सटाणारोड, नागराज हॉस्पिटल निसर्ग हॉटेलजवळ, धन्वंतरी हॉस्पिटल कॅम्परोड, हार्ट अ‍ॅण्ड सोल हॉस्पिटल एकात्मता चौक या सात रूग्णालयांचा जीवनदायीत योजनेत समावेश आहे. त्यामुळे येथे बाधीत रूग्णांनी उपचारासाठी दाखल व्हावे. उपचाराचा खर्च शासनातर्फे दिला जाणार असल्याचे आयुक्त कासार यांनी स्पष्ट केले.

नियंत्रणासाठी चार पथक

जीवनदायी रूग्णालयात बाधितांवर उपचार होतात किंवा नाही यावर नियंत्रण तसेच देखरेखीसाठी चार पथक नियुक्त करण्यात आले आहे. चारही प्रभाग अधिकारी तसेच तेथील पोलीस निरीक्षक व तीन डॉक्टरांचा समावेश या पथकांमध्ये राहणार आहे. हरिष डिंबर, शाम बुरकुल, किशोर गिडगे व पंकज सोनवणे हे चौघे प्रभाग अधिकारी पथकाचे प्रमुख राहतील.

सात जीवनदायीबरोबरच लोटस व लायन्स कॅन्सर हॉस्पिटलमध्ये देखील बाधितांवर उपचार होणार आहेत. बाहेरून डॉक्टरांना पाचारण करत कमतरता दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मनपात प्रवेश बंदी

मनपा अधिकारी, सेवक बाधीत होत असल्याने मनपा संकुलात प्रवेश बंदी आजपासून लागू केली गेली. मास्क न घालणार्‍यांना दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले आहे. जनतेने सुचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच संक्रमण वाढत असल्याचे आयुक्त कासार यांनी पुढे बोलतांना सांगितले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com