
सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
तालुक्यातील अगासखिंड (Agashkhind) येथील सैन्यदलातील प्लाटून हवालदार खंडू भागुजी बरकले (५१) (Khandu Bhaguji Barakle) यांना लेह (जम्मू काश्मीर) येथे कर्तव्यावर असतांना ७ मार्च रोजी वीरमरण (Martyr)आले असून उद्या (दि.१२) त्यांचे पार्थिव विमानाने मुंबई (Mumbai) येथे येणार आहे. दुपारी ३ वाजता अगासखिंड येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, तीन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.
शहिद बरकले हे ३० वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत आहेत. मागील महिन्यात ९ फेब्रुवारी रोजी १५ दिवसांच्या सुट्टीवर ते गावी आले होते. सैन्यदलाकडून त्यांना पूणे येथे निवासस्थान देण्यात आले असून तेथे त्यांची पत्नी, बीडीएसला असणारी मुलगी रितू (वय २४) व इंजिनिअर असणारा मुलगा ऋषिकेश (२२) राहतात. २१ फेब्रुवारी रोजी सुट्टी संपवून ते लेह येथे गेले होते. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व तशी माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आली होती.
डोक्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना सैन्यदलाच्या (Military) चंदिगड येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांचे कुटुंबिय देखील पोहचले होते. मात्र, रुग्णालयात ( Hospital) दाखल केल्यापासून ते कोमातच होते. तेथे उपचार सुरु असतांनाच ७ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यानंतर त्यांचे भाऊ, पत्नी व कुटुंबीय अगासखिंडला परतले होते. सैन्यदलातील सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर उद्या (दि.१२ ) सकाळी ६ वाजता सैन्यदलाचे विमान त्यांचे पार्थिव घेऊन मुंबईला येणार आहे. तेथून कारने पार्थीव अगासखिंड येथे आणण्यात येणार असून तेथे दुपारी ३ वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
शहीद बरकले १२ वी नंतर सन १९९१ मध्ये सैन्यदलात भरती झाले होते. सन २००२ मध्ये डिफेन्स इन स्नियुरिटी केडरमध्ये ते रुजू झाले होते. त्याअंतर्गत त्यांनी श्रीनगर, विशाखापट्टणम, ओझर मिग, जबलपूर, केरळ, आसाम येथे सेवा केली होती. दोन वर्षांपूर्वी लेह येथील फिल्ड अॅमिनेशन डेपोमध्ये ते हवालदार म्हणून रुजू झाले होते व तेथेच कार्यरत होते. करोना काळात लेह येथे उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांना दोन पदके देऊन गौरविण्यात आले होते. नुकतेच ते नायब सुभेदार पदाची परिक्षाही उत्तीर्ण झाले होते.