धक्कादायक : चोपड्यात जात पंचायतने महिलेला दिली थुंकी चाटण्याची शिक्षा

धक्कादायक : चोपड्यात जात पंचायतने महिलेला दिली थुंकी चाटण्याची शिक्षा

कोरोना काळात दिली भयानक शिक्षा

नाशिक

महाराष्ट्र शासनाने जात पंचायत विरोधी कायदा बनविला. परंतु जात पंचायतच्या मनमानीचे प्रकार काही कमी होतांना दिसत नाही. नुकताच एक अमानुष प्रकार समोर आला आहे. चोपडा (जळगाव) येथील एका महिलेने साईनाथ नागो बाबर यांच्याशी 2011 साली विवाह केला होता. मात्र पती दारू पिऊन मारहाण करत असल्याने 2015 मध्ये तिने न्यायालयात रितसर घटस्फ़ोट घेतला. पिडीत महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फ़ोट धुडकावून लावला. दरम्यान पिडीत महिलेने 2019 मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटीत व्यक्तीशी पुर्नविवाह केला. असा पुर्नविवाह पंचांनी अमान्य केला व जात पंचायतने तिला एक लाख रुपयांचा दंड केला.

"ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला अंत्यत लांच्छनास्पद आहे. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचा आधार घेऊन त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.

कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जात पंचायत मूठमाती अभियान

महाराष्ट्रातील पंच एकत्र येऊन न्यायनिवाडा करत दारू मटण खाल्ले व पिडीत परीवारास जात बहिष्कृत केले. त्यांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली. त्यांना मदत करणाऱ्या इतर चार परिवारासही बहिष्कृत करण्यात आले. पिडीत महिलेने पहिल्या नवऱ्या सोबत रहावे , असा पंचांनी हेका कायम ठेवला. पुन्हा जातीत येण्यासाठी एक अमानुष शिक्षा दिली. ती म्हणजे पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे. विशेष म्हणजे कोरोना काळात ही शिक्षा दिली गेली गेली आहे.

पंचांच्या पायातील जोडे पिडीत महिलेने डोक्यावर घेऊन पंचाच्या पायावर नाक घासायचे नंतर पिडीत महिलेचे तोंड काळे करण्याची शिक्षा देण्यात येईल, असे पंचांनी जाहीर केले.

धर्म बदलण्याची धमकी

पिडीत महिला पंचाच्या दबावामुळे सध्या माहेरी राहत आहे. दुसऱ्या नवऱ्यालाही जात पंचायतीने धमकी दिली आहे. न्यायालयाचा निकाल मानायचा असेल तर पिडीतेच्या कुटुंबाने धर्म बदलावा, असा हुकूम पंचांनी काढला आहे. पिडीत महिलेसोबत आई व आजी राहत असुन भिक्षा मागुन पोट भरतात परंतु कोरोना काळात ते पण बंद असल्याने त्यांची उपासमार होत आहे. असे असतांना जात पंचायतला द्यायला त्यांनी शेकडा पाच टक्क्याने सावकाराकडून पैसे आणले. आता पंचांना देण्यासाठी आणखी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्या मदतीला धावून आली आहे. समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, दिगंबर कट्यारे,डाॅ.आयुब पिंजारी व जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंतीताई दिघे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com