वाद निर्मितीसाठी जाँगिंग ट्रॅकचे काम

राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपचे कटकारस्थान; महागठबंधनचा आरोप
वाद निर्मितीसाठी जाँगिंग ट्रॅकचे काम

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

कॉलेज मैदानावरील इदगाह (Idgah) जागा इदगाह ट्रस्टने (Idgah trust) जागा मागितली नसतांना तसा ठराव करणे तसेच जॉगिंग ट्रॅकच्या (Jogging track) कामास देण्यास आलेली परवानगी रद्द करण्याचे ठराव महासभेत केले गेल्याची घोषणा सत्तारूढ राष्ट्रवादी गटातर्फे केली गेली. मात्र 20 दिवस उलटले तरी सदर ठराव अद्याप करण्यात आलेला नाही.

जो ठरावच झाला नाही तो रद्द करण्यासाठी शिवसेनेचे (shiv sena) पदाधिकारी, नेते नगरविकास मंत्र्यांना भेटतात हा सर्व प्रकार शहरात जातीयवाद निर्माण करत जनतेची दिशाभुल करण्यासाठी करण्यात आला असल्याचा आरोप जनता दलाचे सरचिटणीस मुस्तकीम डिग्नेटी यांनी करत येत्या आठ दिवसात जॉगिंग ट्रॅकचे (Jogging track) सुरू असलेले काम त्वरीत न थांबविल्यास आंदोलन (agitation) हाती घेण्याचा इशारा येथे बोलतांना दिला.

येथील मिडिया सेंटरमध्ये महागठबंधन आघाडीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत इदगाह मैदानावरून (Idgah Maidan) शहरात जातीयवाद निर्माण करण्यासाठी मनपातील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress), शिवसेना (Shiv Sena) व भाजपतर्फे (bjp) कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप मनपा विरोधी पक्षनेत्या शानेहिंद निहाल अहमद, जनतादल सरचिटणीस मुस्तकीम डिग्नेटी, माजी उपमहापौर रशीद येवलेवाले व नगरसेवक प्रा. रिजवान खान या नेत्यांनी येथे बोलतांना केला.

इदगाह मैदानाची जागेची मागणी ट्रस्टने केली नसतांना जागा ट्रस्टला देण्याचा ठराव राष्ट्रवादीतर्फे केला जातो हे निश्चितच आश्चर्यकारक आहे. विशेष म्हणजे मैदानावर जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू आहे परवानगी देखील मनपाने दिली आहे. हे काम थांबवावे अशी शहरातील जनतेची मागणी असतांना त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.

जागा देण्याचा तसेच बांधकाम परवानगी रद्द करण्याचे ठराव केल्याचे घोषणा महासभेत केली जाते. मात्र 20 दिवस उलटले तरी कागदावर हा ठराव होत नाही. जो ठरावच झाला नाही तो रद्द करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री, नगरसेवक व पदाधिकारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मागणी करतात हा सर्व प्रकार जनतेची दिशाभुल व फसवणूक करणारा असल्याचा आरोप मुस्तकीम डिग्नेटी यांनी पुढे बोलतांना केला.

इदगाह मैदानाची जागा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. तेथे नमाज पठनासह राष्ट्रीय व धार्मिक सण देखील गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. कोणताही उत्सव साजरा करण्यास कुणीही आडकाठी अथवा विरोध करत नाही. ही वस्तुस्थिती असतांना फक्त म. गांधी विद्यामंदिर व इदगाह ट्रस्टमध्ये वाद निर्माण होवून शहरात हिंदू-मुस्लीम जातीयवाद निर्माण व्हावा या दृष्टीकोनातूनच राष्ट्रवादी व शिवसेनेने हा वाद उकरून काढला आहे.

भाजपने देखील या वादाला खतपाणी मिळेल असेच प्रकार केले आहे. मनपा सत्तेत सामील या तिघा पक्षांचे कटकारस्थान जनतेच्या लक्षात आले असल्यानेच या प्रश्नावरून अप्रिय प्रकार घडलेले नाही. शासकीय जागा कुठल्याही संस्थेच्या नावावर होत नाही फक्त जनतेची दिशाभुल करण्यासाठी हे प्रकार केले गेल्याचा आरोप मुस्तकीम डिग्नेटी यांनी पुढे बोलतांना केला.

मैदानावर जॉगिंग ट्रॅकचे काम मनपाने परवानगी दिली म्हणूनच होत आहे. सदर परवानगी रद्द करण्याची घोषणा महासभेत केली जाते मात्र 20 दिवस उलटून देखील सदर परवानगी रद्द केली जात नाही यामागे राष्ट्रवादी-शिवसेनेची मिलीभगत उघड झाली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात सदर जॉगिंग ट्रॅक कामाची परवानगी रद्द करत मनपाने ते काम थांबवावे, अशी मागणी करत डिग्नेटी यांनी सदर काम न थांबल्यास विरोधी पक्षनेत्या शानेहिंद सर्व नगरसेवकांना पत्र देत या प्रश्नी झालेल्या दिशाभुलाबाबत जनजागृती करतील, असा इशारा त्यांनी पुढे बोलतांना दिला.

मनपाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतांना दिड कोटीचा खर्च सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीवर केला जात आहे. सुरक्षारक्षक नियुक्तीमागे देखील इदगाह मैदानप्रश्नी निर्माण केले गेलेल्या वादाचीच किनार आहे. कुणाची भिती वाटते म्हणून सत्तारूढ गटाने सुरक्षारक्षक नियुक्त केले? असा सवाल शानेहिंद यांनी यावेळी बोलतांना केला. पत्रकार परिषदेस नगरसेवक मन्सुर अहमद, सोहेल अब्दुल करीम, आरीफ हुसेन, कलीमशा भैय्यालाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com