जुलै उजाडला ! पण अजूनही पाणी झिऱ्याहूनच !

जांबूनपाड्याच्या विकास कागदावरच
जुलै उजाडला ! पण अजूनही पाणी झिऱ्याहूनच !

हरसूल । Harsul

निसर्ग सौंदर्याच्या कुशीत स्वातंत्र्याच्या कालखंडात वसलेल्या जांबूनपाड्याच्या (Jambunpada Village) ग्रामस्थांची विकासाची पहाट अजूनही उजडलेली नाही. पाड्यात जाण्यासाठी पायवाट धड तर नाहीच परंतु मूलभूत सुविधाही (Primary Infrastructure) अद्याप पोहचलेल्या नाहीत. यामुळे ग्रामस्थांच्या पाचवीला पुजलेली समस्या स्वातंत्र्यानंतरही जैसे थे आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwer Taluka) अतिदुर्गम खडकओहळ ग्रामपंचायत (Khadakohol Grampanchayat) अंर्तगत येणारा जांबूनपाडा छोटासा पाडा आहे. या पाड्यात मिळालेल्या माहितीनुसार 29 कुटुंब वास्तव्यास असून 189 लोकसंख्या आहे. पाड्यात चौथी पर्यंत द्विशिक्षकी जिल्हा परिषदेची शाळा (ZP School) असून घोटपाड्यासह 17 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्याच बरोबर अंगणवाडी केंद्रात (Anganwadi Center) 21 लाभार्थ्यांचा लवाजमा आहे.

मात्र मूलभूत समस्यांच्या सोयीसाठी आजही येथील ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे. खडकओहळ येथून साधारणतः या जांबूनपाड्याचे अंतर जवळपास 3 किमी आहे. ‘एक ना धड आणि भराभर चिंध्या’ या म्हणीप्रमाणे पाड्याच्या रस्त्याची दयनिय दुरवस्था आहे. खडकओहळ येथूनच हा रस्ता पायवाट धारण करत असल्याने ग्रामस्थांना डोलीचा आधार घेत रुग्णांना 3 किमी अंतर आणावे लागते,यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. रात्रीच्या वेळी ही कल्पना केलेलीच न बरी असते.

त्याचबरोबर पाड्यात अद्याप कुठल्याही योजनांची अंबलबजावणी झालेली दिसत नाही. पाड्यात अंगणवाडी केंद्रासह, जिल्हा परिषद शाळा दिसून येत असून कुठल्याही भौतिक किंवा मूलभूत सुविधा ग्रामस्थांपर्यंत पोहचल्या असल्याचा मागमुस दिसून येत नाही. वीज, रस्ते, पाणी, आरोग्य आणि ऑनलाइन शिक्षण या पाड्यामध्ये खरेच पोहचले असेल का? या पाड्याला भेट दिल्याशिवाय उमजनार नाही.

करोना संसर्गाच्या काळात आरोग्य, पाणी, शिक्षण सारख्या प्रणालीना शासनस्तरावर महत्व दिले असले तरी जांबूनपाडा ग्रामस्थांच्या भाळी अजूनही अंधारच आहे असेच म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण अजूनही जांबूनपाडा ग्रामस्थ समस्यांच्या गर्तेतुन सुटलेले दिसत नाही. या समस्या सोडविण्याची मागणी मथीबाई धनगरे, वैशाली धनगरे, भागाबाई खुताडे, मीराबाई खुताडे, वेणू धनगरे, कौशल्या धनगरे, विमल बोगे, सुनीता खुताडे, भारत वड, भाऊराज धनगरे, हरिदास वड, लहूदास किरकिरे, रोहित धनगरे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

जांबूनपाड्यात मानवी पिढ्यान पिढया जात आहे. मात्र कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत. अजूनही डोंगरावर जाऊन पाणी भरावे लागते. झिर्‍याच्या दूषित पाण्यावर आम्ही आमची तहान भागवित आहे. हे आमचे नशीब म्हणावे लागेल.

- मथीबाई धनगरे, महिला, जांबुनपाडा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com