
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
काल (दि.०१ सप्टेंबर) रोजी जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंतवरली सराटी गावामध्ये (Antwarli Sarati Village) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषणास (Hunger Strike) बसलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी (Police) लाठीचार्ज केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे आंदोलकांनी (Protester) आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणवार जाळपोळ झाली व काही आंदोलक आणि पोलीस जखमी झाले...
या घटनेनंतर राज्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला असून या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटतांना दिसत आहे. तसेच या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मराठा समाजाकडून (Maratha Community) आंदोलन करत निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच आता या घटनेचे पडसाद नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात देखील उमटल्याचे पाहायला मिळत असून जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे देखील जालना येथील घटनेचा निषेध करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख समाधान बोडके, मनसेचे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवराज कोठुळे, त्र्यंबकचे माजी नगराध्यक्ष योगेश तुंगार, संजय सोनवणे, दीपक कसबे, पहिलवान परशुराम पवार, पांडुरंग आचारी यांच्यासह आदी नेत्यांनी एकत्र येत जालना येथील घटनेचा निषेध करत आंदोलन केले.
यावेळी बोलतांना पुरुषोत्तम कडलग (Purushottam Kadlag) म्हणाले की, ज्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले त्या संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याची मुभा असते. त्याच संविधानाला अनुसरून जालना येथे शांततेच्या मार्गाने काही मराठा युवकांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले होते. पंरतु, ते आंदोलन दाबण्याचे प्रयत्न जालना येथे करण्यात आले. त्यामुळे आम्ही आम्ही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मराठा तसेच बहुजन समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कदाचित राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विसरले असतील की राज्यामध्ये एकेकाळी एक ठिणगी पडली आणि त्यानंतर अख्खा महाराष्ट्र पेटला होता. मात्र, आम्ही कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी शांत आहोत. त्यामुळे आता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा मराठा समाजाची, छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी अशी मागणी यावेळी कडलग यांनी केली.