
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांना समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील, या त्यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे...
राष्ट्रपती राजवट उठवण्यास पहाटेच्या शपथविधीमुळे मदत झाल्याचे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पवारांच्या विधानावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, जे सरकार दिल्लीत आणि महाराष्ट्रात होते त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावून महाविकास आघाडीचे सरकार येऊ नये म्हणून कोंडी केली होती. ती कोंडी फुटेल की नाही अशा शंका सगळ्यांनाच होती.
आम्ही आमदारांचे बहुमत जरी दाखवले असते तरी ज्या प्रकारचे राज्यपाल राजभवनात होते. त्यांनी बहुमताची डोकी मोजायलाच पाच वर्षे घेतली असती, जे की आपण पाहतोच आहोत निवडणूक आयोगात काय सुरु आहे. पण पहाटेच्या शपथविधीमुळे ही कोंडी फुटली आणि लख्ख उजाडले.
फक्त २४ मिनिटांत राष्ट्रपती राजवट निघाली आणि मविआचा मार्ग नक्कीच मोकळा झाला. हे जे पवारांनी सांगितल्याचे तुम्ही सांगता तर हे सत्य आहे. शरद पवारांना ओळखायला शंभर जन्म घ्यावे लागतील, असे मी मागे एकदा म्हटले होते तेव्हा माझ्यावर टीका करण्यात आली. तुम्हाला आता कळलेच असेल. पण यासाठी मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानतो की त्यांनी ही कोंडी फोडायला मदत केली, असे राऊत यांनी म्हटले आहे.