
सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
करोना काळानंतर समाजात अनेक बदल घडताना आपण बघितले. त्यात काही चांगले, काही वाईटही आहेत. करोनानंतर राज्यात बालविवाहांचा प्रश्नही गंभीर झाला असून त्याला आळा घालणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
येथील निर्भया सामाजिक संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात पार पडलेल्या राज्यस्तरीय 'निर्भया गौरव पुरस्कार' वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड होते.
व्यासपीठावर ज्येष्ठ उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे, नंदा भाबड, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, भाजपचे ज्येष्ठ नेते बंडूनाना भाबड, शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे, काणसा-वारणा फाउंडेशनचे संस्थापक दीपक पाटील, माजी नगरसेविका शीतल कानडी, सागर सानप, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, साहेबराव कुटे, लहानू भाबड, हेमंत भाबड उपस्थित होते.
कायद्याचा धाक असला तरी पालक बालविवाह लावून देत आहेत. नोंदणी झालेले आणि न झालेल्या अशा बालविवाहांची संख्या मोठी असून त्याला पायबंद घालण्याची गरज आहे. बालविवाहांच्या बरोबरीने माता व बालमृत्यूचे प्रमाणदेखील वाढल्याची धक्कादायक माहिती पुढे येत असल्याचे सांगून महिलादिनी महिलांसाठी कविता करणारे पुरुषांचे हात सातबारावर महिलांचे नाव लावतील तो खरा महिला दिन असेल असे चाकणकर म्हणाल्या.
समाजात महिला व पुरुषांना समान संधी मिळत असल्याचे आशादायक चित्र असून त्याचा आनंद असल्याचे कोकाटे म्हणाल्या. पुरस्कारार्थी महिला व आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आव्हाड, भाबड, पुरस्कारार्थी सुनीता नागरे, भीमाबाई जोंधळे, डॉ. संध्या खेडेकर, दीपक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा मयुरी वनवे, उपाध्यक्षा सृष्टी भाबड, खजिनदार प्रिती आव्हाड, पंढरीनाथ आव्हाड, राधाकिसन वनवे, अनिल आव्हाड, शंकर आव्हाड यांंच्यासह सहकार्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. गोरक्ष भवर यांनी सूत्रसंचालन केले.
या महिलांचा सन्मान
लोकनेते वाजे विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या बॅटमिंटन संघासह श्रद्धा संजय चोथवे (सिन्नर), स्मिता माने (नाशिक), भीमाबाई जोंधळे (नाशिक), डॉ. संध्या खेडेकर (संगमनेर), नीता केदारे ( लोणी), शैला वाघ (संगमनेर), नीता दीदी (येवला), सुनिता नागरे (दातली), जयश्री पाटील (कराड), अॅड. कविता पराते (नाशिक), आशाबाई लासुरे (नाशिक), नेहा शिंदे (सिन्नर), मैत्री फाउंडेशन (नाशिक) यांच्यासह अनेक महिलांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.