बिलावर परवाना क्रमांक टाका अन्यथा...; अन्न, औषध प्रशासनाचा इशारा

बिलावर परवाना क्रमांक टाका अन्यथा...; अन्न, औषध प्रशासनाचा इशारा
USER

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

ग्राहकांनी विकत घेतलेल्या अन्न पदार्थाच्या (Food) बिलावर (Bill) अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाकडून घेतलेल्या 14 अंकी परवाना क्रमांक (License number) टाकणे अन्न व्यावसायिकांना बंधनकारक करण्यात आले आहे...

दि. 1 जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नियमाचे उल्लंघन करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा अन्न प्रशासन नाशिक विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके (Chandrasekhar Salunke) यांनी दिला आहे.

अन्न व्यावसायिकांची विशिष्ट ओळख दर्शवण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या कॅशमेमो, विक्री बिले यावर 14 अंकी परवाना अथवा नोंदणी क्रंमाक छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.

परवाना अथवा नोंदणी क्रमांकावरून (Registration number) अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरून त्या अन्न व्यावसायिकाच्या परवान्याची वैधता, पेढीचे नाव व पत्ता याबाबतची माहिती ग्राहकास सहज मिळू शकते. म्हणजेच परवाना क्रमांक माहीत असल्यास ग्राहक हा थेट प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर तक्रार अथवा इतर त्रुटी नोंदवू शकतील. यापूर्वीच पॅकिंग करण्यात आलेल्या अन्नपदार्थाच्या लेबलवर एफएसएसएआय क्रमांक टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे.

परंतु रेस्टॉरंट, मिठाई दुकानदार केटरर तसेच किरकोळ विक्रेते यांना हा क्रमांक टाकणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे आता त्यांच्या बिलांवर परवाना क्रमांक टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पद्धतीमुळे ग्राहकांसह प्रशासनालाही अन्न व्यावसायिक व अन्न पदार्थांचा शोध घेणे सोपे होणार आहे.

या तरतुदींचे पालन न केल्यास अन्न व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006, नियम व नियमन 2019 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नाशिक विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके, सहायक आयुक्त गणेश परळीकर, योगेश बेंडकुळे, अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com