शाळा बंद असल्यातरी मुलांना ‘शिकते’ ठेवणे महत्त्वाचे!

अक्षरनंदन शाळा राबवतेय विविध उपक्रम
शाळा बंद असल्यातरी मुलांना ‘शिकते’ ठेवणे महत्त्वाचे!
शिक्षण

नाशिक। Nashik

करोनाच्या काळात शाळा बंद असल्यातरी मुलांना ‘शिकतं’ ठेवायचे. त्यांच्यापर्यंत एकतर्फी आशय पोचवायचा नाही. शिक्षणाचा आभास निर्माण करायचा नाही. त्यांना शिकवण्यापेक्षा त्यांनी शिकणे महत्त्वाचे आहे. लॉकडाऊनच्या या काळात शाळा मुलांपर्यंत पोचते आहे. पण हा तात्पुरता पर्याय आहे. प्रत्यक्ष भेटीला पर्याय नाही. ऑफलाईन शिक्षणासाठी उपक्रम आखताना हा विचार मनाशी पक्का होता असे पुण्याच्या अक्षरनंदन शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी पंडित आणि शैक्षणिक संयोजक लारा पटवर्धन यांनी सांगितले.

प्रश्न : विद्यार्थ्यांना शिकते ठेवण्यासाठी शाळेने काय पूर्वतयारी केली?

उत्तर : लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यात शिक्षक एकत्र आले. लॉकडाऊन सुरू असेपर्यंत पालकांच्या मदतीने मुलांचे शिकणे सुरू ठेवता येईल असे विषय काढले. उदाहरणार्थ घरात काम करणे, कामात मदत करणे. प्रत्यक्ष कृती करणे. एखादा पदार्थ बनवायला शिकणे. त्याची कृती मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिणे. पण लॉकडाऊन इतका लांबेल असे वाटले नव्हते. शाळा लवकर सुरु झाल्या नाही तर मुलांचे कसे होईल या विचाराने सुरुवातीला पालक अस्वस्थ झाले होते. त्यांच्याशी संवाद साधला.

शाळा तुमच्याबरोबर आहे. शाळेने दिलेले उपक्रम अंमलात आणण्यासाठी मुलांना मदत करा, या उपक्रमातून आपण त्यांचे शिक्षण सुरु ठेवू शकतो असे पालकांना समजावून सांगितले. ऑनलाईन तासिका घ्याव्या लागल्या तर त्यासाठी शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले. पालकांचे सर्वेक्षण केले. स्मार्ट फोन आहे का? इंटरनेटची जोडणी आहे का? तिचा स्पीड काय आहे? असे अनेक प्रश्न विचारले. त्यातून पालकांची संमिश्र परिस्थिती समोर आली. आणि मुलांना शिकते ठेवण्यासाठी काय करावे लागेल याची साधारण कल्पना आली. मग थोड्या सूचना, काही छोटे ऑडीओ आणि व्हिडीओ यांच्या माध्यमातून कोणत्या संकल्पना शिकवू शकतो याची विषयवार यादी केली आणि ऑफलाईन शिकणे सुरु झाले.

प्रश्न : कोणकोणते उपक्रम राबवले जातात?

उत्तर : इयत्तांप्रमाणे स्वरूप वेगवेगळे आहे. मुलांना आठवड्यातून तीनदा उपक्रम दिले जातात. 2 औपचारिक आणि 1 अनौपचारिक. औपचारिकमध्ये गोष्ट सांगणे: त्यातून त्यांची श्रवण क्षमता विकसित होते. एखाद्या दोन प्रत्यक्ष कृती करायला आणि त्या लिहून काढायला सांगितल्या जातात. समजा व्याकरण शिकवायचे असेल तर त्याचा एखादा छोटासा ऑडिओ, शिक्षिकेने लिहिलेल्या माहितीचे फोटो विद्यार्थ्यांना पाठवतो. अनौपचारिक उपक्रमात नृत्य, नाट्य, संगीत, खेळ यांची कृती करायला लावली जाते.

मुलांना काही कामे सुचवली जातात. उदाहरणार्थ मुलांना त्यांची खोली झाडायला सांगतो. त्यातून मुले झाडू कसा धरायचा? झाडायचे कसे? सगळा केर एका जागी एकत्र कसा करायचा? मुलांना हे काम करताना कसे वाटले? तेच काम परतपरत करताना त्यात सफाई कशी येत गेली? हे सगळे मुले लिहितात आणि ते पालक ते आम्हाला पाठवतात. याच्या आम्ही फाईल्स तयार केल्या आहेत. असे अनेक उपक्रम सकारात्मक पद्धतीने पार पडावेत यासाठी पालक आणि शिक्षकांचा व्हॉट्सप ग्रुप बनवला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांशी शाळेचा नियमित संवाद आहे.

प्रश्न : मुले ऑनलाईन येतच नाहीत का?

उत्तर : मुलांना एकमेकांना भेटण्याची आणि बघण्याची उत्सुकता असतेच. मग आम्ही लहान मुलांना कधी कधी झुमवर एकत्र आणतो. ते आपले अनुभव शेअर करतात. समूहासमोर मते मांडतात. त्यांची मने मोकळी होतात. हेही शिकणेच आहे. मोठ्या वर्गातील मुलांसाठी आठवड्यातून दोन किंवा तीनदा लाईव्ह सेशन घेतली जातात. व्हिडीओ देखील जास्तीत जास्त 5 ते 15 मिनिटांचे असतात. त्यातही कृतीवर भर द्यायचा प्रयत्न आहे.

प्रश्न : ऑफलाईन शिकण्यासाठी पालकांचे आणि मुलांचे सहकार्य?

उत्तर : शाळेची उपक्रमशीलता पालकांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.पालक शिक्षकांच्या बरोबरीने सहभागी होत आहेत. ऑफलाईन शिकताना काही मुलांना अडचणी येतात. पालकांचा गट त्या अडचणी सोडवतो. शाळा कधी सुरू होतील याविषयी अनिश्चितता आहे. मुले कंटाळली आहेत. त्यावर उपाय म्हणून मुलांचे गट बनवणार आहोत. गटातील मुले एकमेकांशी सतत संपर्कात राहतील याची दक्षता घेणार आहोत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com