ग्रामसेवकांना बदल्या लागू नाही का?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सवाल
ग्रामसेवकांना बदल्या लागू नाही का?

नाशिक । प्रतिनिधी

शासकीय सेवेतील अधिकारी-सेवकांच्या नियमितपणे बदल्याबाबत नियम लागू असताना हा नियम गावोगावच्या ग्रामसेवकांना लागू नाही का, असा मुद्दा जिल्हा परिषद सदस्यांमधून उपस्थित केला जात आहे.याविरोधात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांची प्रशासकीय बदली करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली आहे.जिल्ह्यातील तालुक्यात अनेकजण 12 ते 14 वर्षांपासून एकाच गावात सेवा करत असून, यामुळे लोकप्रतिनिधींना न जुमानता कामकाज चालते,असा आरोप ग्रामस्थांनी सदस्यांकडे केला आहे. किंबहुना अनेकजण तर राजकीय हस्तक्षेप करत असल्याने आता तरी बदली व्हावी, अशी मागणी सदस्यांनी संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीआहे.

पालकमंत्र्यांना निवेदन देणार

तीन वर्षांपासून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांची बदलीप्रक्रिया प्रलंबित आहे. यावर्षीही करोनामुळे प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. प्रशासकीय अडचण लोकप्रतिनिधींनाही मान्य आहे. मात्र, काही ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी अनेक वर्षांपासून एकाच गावात मुख्यालयी असल्याने व शासनस्तरावर बदलीप्रक्रिया स्थगित असल्याने सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा अवमान केल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत.

अनेक वर्षांपासून एकाच गावात असल्याने स्थानिक राजकरणात भाग घेऊन गोरगरिबांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सध्या ऐच्छिक बदली प्रक्रिया शक्य नसेल तरी प्रशासकीय बदली प्रक्रिया तातडीने करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.