हम नही सुधरेंगे !

नाशिककरांचा निष्काळजीपणा देतोय करोनाला निमंत्रण
हम नही सुधरेंगे !

नाशिक। खंडू जगताप

जिल्हा तसेच देशभरात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनला मंगळवारी (दि.23) बरोबर एक वर्ष पुर्ण होत आहे. त्यापुर्वीपासून कोरोना विषाणुबाबत जगभरातून समोर येत असलेली विविध भयावह माहिती, उपचार नसल्याने हतबल असलेले प्रगत राष्ट्रांसह सर्व देश, अनेकांना आजही त्यावेळी आलेले दडपण, दहशत, कुटुंबाबद्दल वाटत असलेली भिती याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

परंतु यातून आपण काहीच शिकलो नाही. करोना गेल्याच्या अविर्भावात निष्काळजीपणा करत आपणच त्याला पुन्हा बोलावत आहोत यातून काही झाले तरी हम नही सुधरेंगे असेच नाशिककरांचे धोरण असल्याचेच सध्या तरी चित्र आहे.

23 मार्च 2020 रोजी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तो सुरू झाल्यानंतर सुनी पडलेली शहरे, गावे सर्वांनी पाहिली, मुंबई सोडून आपआपल्या गावी जाणारे जथ्थेच्या जथ्थे महामार्गावर नाशिकरांनी पाहिले, जगण्यासाठी, अण्णासाठी चाललेली दिणवाणी धडपड, गेलेल्या नोकर्‍या, बेरोजगारी, आपलेच अर्ध्यावर आलेले पगार, त्यातच कुटुंबाजी गुजरान करण्याची तारेवरीची कसरत तर ज्यांना वा ज्यांच्या कुंटुबातील व्यक्तीला करोनाची लागण झाली त्यांच्या कटु आठवणी या काळात आपण घेत असलेली काळजी असे सर्वच प्रत्येकाला आठवत असेल.

करोनाला सामोरे कसे जायचे, उपचारांची माहिती नाही अशा काळात कडक लॉकडाऊन पाळत, कोरानाचे नियम, सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सातत्याने सॅनिटायझरचा वापर, हातांची स्वच्छता असे सर्व नियम काटेकोरपणे पाळत सर्वांनी या अदृष्य संकटाला धिराने तोंड दिले. तोपर्यंत आपल्या जिल्ह्यात कोरोना झालेल्यांचा आकडा लाखाच्यावर केव्हाच पोहचला होता.

यात निष्काळजीपणे वागणार्‍या नागरीकांना आवरण्यासाठी पहिल्या फळीतील पोलीसांपैकी सुमारे तीनशे पोलीसांना करोनाने गाठले, यातील पन्नासपेक्षा अधिक जण कोरोना शहिद झाले, हिच बाब आरोग्य यंत्रणेत कार्यरत डॉक्टर, परिचारीका, सफाई कर्मचारी यांचीही झाली. यासाठी कुठेतरी बेजबाबदार वागणारे आपण कारणीभूत आहोत असा लवलेशही कोणाच्या मनात आला नाही. सर्वांच्या प्रयत्नांच्या परिणामी सप्टेंबर ऑक्टोंबर पासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरूवात झाली.

शासनाने लॉकडाऊन शिथील केला. पुन्हा बाजार, मंदिरे गजबजली, तर आली आली म्हणता कोरोना प्रतिबंधक लस जानेवारी 2021 मध्ये जिल्ह्यासह देशभरात दाखल झाली आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण सुरू करण्यात आले. यामुळे आता लस घेतल्यानंतर कोरोना आपल्याला होणारच नाही. असाच समज पसरत गेला. यातून पुन्हा निष्काळजीपणा वाढीस लागला.

10 ते 15 लोकांमध्ये पार पडलेल्या लग्नांसाठी डिसेंबरपासून शेकडोच्या घरात गर्दी जमू लागली, पोलीसांची बंदी असतानाही सण, वार, तीथी साजरे करण्यास नागरीक गर्दी करू लागले, शिवजयंती महोत्सवात नाशिकरोड येथे लाखोच्या संख्येने गर्दी जमल्याचे सर्वांनी पाहिले. दुसरीकडे कोरोना- बिरोना काही झालेच नव्हते अशा अर्हिभावात बाजारपेठांमध्ये गर्दी करून नागरीक मजा हजा करू लागले.

सिनेमागृहे, नाट्यगृहे भरू लागली, नेते, भाई, दादांच्या वाढदिवसाला गर्दीच गर्दी होऊ लागली, या गर्दीतही मास्क वापरणे म्हणजे कमी पणाचे वाटू लागले, सॅनिटायझरचा वापर बहूतांशजन विसरून गेले. परिणामी गेला गेला म्हणता करोनाचे संकट पुन्हा केव्हा आपल्या उंबर्‍यावर धडकले याचा पत्ताच कोणाला लागला नाही. जो तो आपल्याला काय होत नाही इथपासून ते कोरोना नव्हता केवळ राजकीय डाव असल्याच्या गप्पा झोडत अविचारीपणे सर्व कोरोना नियम वार्‍यावर सोडून वावरत होते.

या सर्वाच्या परिणामी कारोनाचे संकट पुन्हा गहिरे होऊ लागले आहे. अवघ्या पंधरवड्यामध्ये रूग्ण संख्या चारपटीने वाढली. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यांवरून 80 टक्क्यांवर घसरले आहे. मागील पाच दिवसात सरासरी दोन हजार पेक्षा अधिक कोरोना रूग्ण नव्याने दाखल होऊ लागले आहेत. अवघ्या आठवडाभरात रूग्ण संख्या 30 हजार पेक्षा अधिक झाली आहे. हे संकट पुन्हा नव्या ताकदीने आले आहे.

तु तु मै मै करणार्‍या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांना पालकमंत्र्यांनी धारेवर धरल्यानंतर जिल्हा तसेच शहर परिसरात सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी तसेच शनिवारी व रविवारी अंशत लॉकडाऊन करण्यात आला आहे. याची अंमल बजावणी करण्याचे काम पोलीसांनी उशिरा का होईना सुरू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आहे.

मात्र अजूनही गल्लोगल्ली दुकान्यांच्या पायर्‍यांवर बसून नागरीक गप्पा झोडताना दिसत आहेत. सर्वत्र वाहनांचा मोठा वावर सातत्याने होत आहे. यामुळे काही झाले तरी दुसर्‍याकडे बोट दाखवून हम नही सुधरेंगे असेच अनेक नाशिककर दाखवून देत असल्याचे चित्र आहे. नियम असूनही त्यातून पळवाट काढून प्रत्येकजण प्रशासनाला फसवु शकतो. परंतु कोरोनाला फसवता येणार नाही याची जाणीव ठेवण्याची वेळ आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com