नाशकातील उद्योगांना सोनेरी दिवस

बड्या कंपन्यांची गुंतवणूक;
नाशकातील उद्योगांना सोनेरी दिवस

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत गेल्या वर्ष ते दीड वर्षभरात सुमारे हजार ते दीड हजार कोटींहून अधिक बाहेरची गुंतवूणक आली व काही प्रस्तावित असल्याने आगामी काळात नाशिकमध्ये उद्योग वाढीसोबतच नवीन रोजगार देखील निर्माण होणार आहे.

कोविडमुळे उद्योग चक्र थांबले होते. मात्र त्यानंतर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकार्‍यांनी नाशकात उद्योग वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. नाशकात असलेल्या बड्या कंपन्यांच्या अधिकार्‍यांना भेटून त्यांची व्हेंडरशिप येथील उद्योजकांना मिळण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.

नाशकात असलेल्या एचएएल या कंपनीला नुकताच 8 हजार 800 कोटी रुपयांचा ठेका मिळाला आहे. त्याठिकाणी लागणारे लहान मोठे पार्टस् कसे तयार केले जातील, यासाठी आगामी काळात नाशकात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच नाशकातील जुन्या उद्योगांसह नवउद्योजकांना देखील ही सुवर्णसंधीच उपलब्ध होणार आहे. यासोबतच सॅमसोनाईट या कंपनीने नुकतीच नाशकात दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

निमाच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर व्हेंडरच्या नोंदणीचे काम देखील याठिकाणी सुरु झाले. उद्योजकांना नवीन काम मिळणार असल्याने व नवीन रोजगार निर्मिती देखील होणार असल्याने उद्योजकांत आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही काळात आयमाचे शिष्टमंडळ चेन्नई, नोयडा येथे झालेल्या जागतिक स्तरावरील उद्योजकांच्या प्रदर्शनात सहभागी झाल्याने बाहेरील कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर काम आगामी काळात नाशिकच्या उद्योजकांना भेटणार आहे व त्यासाठी होणार्‍या प्रक्रियेला आता वेग आला आहे.

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीसह गोंदे, वाडीवर्‍हे, विल्होळी, सिन्नर, दिंडोरी या औद्योगिक वसाहतीमध्ये देखील लहान, मोठे उद्योग आता सुरु झाले आहेत व बर्‍याच बड्या कंपन्यांचे व्हेंडर देखील त्याठिकाणी असल्याने कामाला आता वेग आला आहे. यामुळे नाशकातील उद्योंगांना सोंनेरी दिवस आल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com