जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिन विशेष :  व्यसनमुक्त गाव चळवळ राबवण्याची गरज
USER

जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिन विशेष : व्यसनमुक्त गाव चळवळ राबवण्याची गरज

नाशिक । नरेंद्र जोशी

अंमली पदार्थांच्या सेवनामुळे वयाच्या चाळिशीतच अकाली मृत्यू व मानसिक, शारीरिक अपंंगत्वाचे प्रश्न उद्भवू लागले असून देशातील 40 लाख तरुण या अंमलीपदार्थांच्या विळख्यात अडकले आहेत. भावी पिढी सृदृढ ठेवण्यासाठी तंंटामुक्त गावाप्रमाणेच व्यसनमुक्त गाव ही चळवळ आता राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

आज जागतिक अंमलीपदार्थ विरोधीदिन आहे. त्यानिमित्त अंमलीपदार्थांच्या विळख्याचा आढावा घेतला असता वरील बाब प्रकर्षाने समोर आली. भारत तरुणांंचा देश आहे, व्यसनी तरुणांंचा नाही. अंमलीपदार्थ मग ते कुठल्याही प्रकारचे असो सर्रासपणे बाहेरच्या देशातून आपल्या देशात मग राज्याराज्यांमध्ये याची तस्करी होत आहेे.

चटकन नशा, गुंगी आणणारे पदार्थ याचा वापर वाढला आहे आणि हे खूप महागडे आहेत. यामध्ये अल्कोहोल, चरस, गांजा, सिगारेट, ड्रग्स, कोकेन, ओपीऑईडस् याशिवाय व्हाईटनर, ब्राऊन शुगर यांसारख्या वेगवेगळ्या नशा वेगवेगळ्या माध्यमातून करत असल्याचे आढळून येत आहे. याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत आहे. याचा वापर मोठ्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात होत आहे.

कुठल्याही अंमलीपदार्थांचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे. कारण त्याचा परिणाम हळूहळू मेंदूवर होऊन ताणतणाव, डिप्रेशन, चिडचिड, राग, चिंता यांसारख्या मानसिक समस्या उद्भवतात. करोनाकाळात लॉकडाऊनमध्ये अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. कारण दैनंदिन जीवनात येणार्‍या लहान-मोठ्या समस्या याकाळात खूप वाढलेल्या आहेत. विद्यार्थी असेल तर शिक्षणाची, करिअरची, गृहिणींना घर चालवण्याची, नोकरदारांना नोकरी टिकवण्याची, व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाबाबतची चिंता सतावत आहे.

मोठ्या शहरांमध्ये स्त्रियासुद्धा अंमली पदार्थ सेवनाच्या बळी ठरत आहेत. असे नशेचे पदार्थ सहज उपलब्धही होत आहेत. याचा नकारात्मक परिणाम म्हणून गुन्हेगारी वाढत आहे. व्यसनी व्यक्ती व्यसनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी चो़र्‍या, लूटमारीचा मार्ग अनुसरत आहे. 80 टक्के अपघातांना व्यसन कारणीभूत ठरत आहे. चाळिशीच्या आतील बहुतांशी मृत्यूला, आत्महत्यांना व्यसन कारणीभूत आहे. शारीरिक, मानसिक अपंगत्वातील 40 टक्के अपंंगत्वांना अंमलीपदार्थांचे व्यसन कारणीभूत ठऱले आहे.एकूण व्यसनानील 20 टक्के अल्पवयीन मुले या व्यसनाच्या आहारी गेले आहे.

एकदा व्यसनी मुलगा करायचे व नंतर कायमची आपली पोळी भाजून घेणा़ऱे सातत्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा व्यसन जडले की तरुण कुठल्याही थराला जाऊ शकतो. म्हणूनच चोरी, दरोडा, लूटमार, नशा करून वाहन चालवणे याशिवाय नशेमध्ये गैरकृत्य होत आहेत. भुरट्या चोर्‍यांना नशा कारणीभूत आहे. अशाप्रकारे याचा शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, शैक्षणिक, मानसिक, सामाजिक जीवनावर परिणाम होत आहे.

हे सर्व टाळण्यासाठी घरामध्ये सकारात्मक वातावरण हवे, मुले मोठे होईपर्यंत त्यांचे बाहेरच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीवर पालकांचे लक्ष असावे. घरात एकमेकांत संभाषण होणे गरजेचे आहे. मोठ्या व्यक्तींना कामाच्या बाबतीत खूप व्याप असेल तर दिनचर्येत बदल करायला हवा, असे तज्ज्ञ सांंगतात.

आपल्या कुटुंबामध्ये आजही जर अंमलीपदार्थ सेवन करणारा कोणी असेल किंवा त्या समस्येला घेऊन कोणी तणावात असेल तर तुम्ही तुमच्या सायक्रॅयाटिस्ट, सायकॉलॉजिस्ट, समुपदेशक यांना भेटा. लक्षात घ्या, नशा करणारी व्यक्ती ही समाजासाठी तर सोडाच पण आपल्या कुटुंबासाठीदेखील अपंग आहे. अशा व्यक्तींना सामाजिक अपंगत्व प्राप्त झालेले असते. म्हणून यावरील उपचार हे आपल्याच हातात आहेत. म्हणून चीनमधून येणार्‍या करोनापेक्षा आपण स्वतःहून ओढवून घेतलेल्या व्यसन या आजाराला दूर सारूया आणि आपला देश हा व्यसनी तरुणांचा नाही तर सुदृढ आणि सक्षम तरुणांचा आहे, अशी ओळख जगभरात करूया.

डॉ. अमोल पुरी, अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मानस व्यसनमुक्ती केंद्र, नाशिक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com