गुरुपौर्णिमा : युट्यूबच्या माध्यमातून लाखों सेवेकऱ्यांशी संवाद

घरी राहूनच गुरुपौर्णिमा साजरी
स्वामी समर्थ केंद्र, त्र्यंबकेश्वर
स्वामी समर्थ केंद्र, त्र्यंबकेश्वर

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात सक्रिय असणाऱ्या लाखो सेवेकरी महिला पुरुषांनी आज करोना पार्श्वभूमीवर आपापल्या घरीच गुरूपुजन करून गुरुपौर्णिमा साजरी केली.

देशासमोर उभ्या ठाकलेल्या करोना संकटातून सुटका व्हावी यासाठी सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना साकडे घातले. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा, व्यास पौर्णिमा सर्व भारतभर गुरुपौर्णिमा म्हणून मोठ्या भक्तीभावाने, मंगलमय वातावरणात साजरी केली जाते.

दरवर्षी दिंडोरी येथील समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र , त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठ व देश आणि देशाबाहेरील हजारो केंद्रांवर गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी करोना पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व नियम पाळून सेवेकरी महीला, पुरुषांनी, बाल गोपाळ यांनी हा उत्सव घरीच साजरा करावा असा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला.

दिंडोरी येथे प पू गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर येथे गुरुपीठ व्यवस्थापक चंद्रकांत दादा मोरे यांनी गुरुपादुका पूजन केले.

तदनंतर त्यांनी ऑनलाईन जगभरातील लाखो सेवेकर्यांशी संवाद साधला. गुरुमाऊली म्हणाले,

आज देशासमोर विविध निसर्गनिर्मित, मानवनिर्मित समस्या आहेत. करोना सारखी महामारी आहेच पण त्याचबरोबर चीन, पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्रांकडून पण धोका उत्पन्न झाला आहे. यासर्व संकटांमधून आपली सुटका व सरशी व्हावी यासाठी विविध प्रकारची अध्यात्मिक उपाययोजना आपण करतोच आहोत पण भविष्यात सुद्धा वेगाने, मोठ्या प्रमाणात यासाठी विविध सेवा करण्याची आपण सर्वांनी तयारी ठेवावी लागेल.

आज सकाळी दिंडोरी व त्र्यंबकेश्वरमध्ये मोजक्याच सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत पदुकापुजन, महाराजांची पूजा, अभिषेक, आरती संपन्न झाली. सकाळी ११ वाजता गुरुमाऊली यांनी तर १२ वाजता चंद्रकांत दादा मोरे यांनी यु ट्यूब वरून मार्गदर्शन केले. या थेट मार्गदर्शनाचा लाभ परदेशातीलही हजारो सेवेकरी महीला, पुरुषांनी घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com