नाशिक | Nashik

करोनाच्या संकटकाळात ‘कराेना' संबंधित सर्वेक्षण, जनजागृती, मदत कार्य अशा विविध कार्यवाहीदरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्णयानुसार ५० लाख रुपयांचे सर्वंकष वैयक्तिक अपघात विमा कवच लागू केले आहे.

त्यामुळे कोरोनाशी संबंधित कर्तव्यावर असताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना या विमा कवचाचा लाभ मिळणार आहे.

कराेना विषाणूच्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदतकार्य या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा सर्वंकष वैयक्तिक अपघात विमा कवच पुरविण्याबाबत वित्त विभागाने २९ मे २०२० मध्ये शासन निर्णय लागू केला होता.

त्याचप्रमाणे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही विमा कवच मिळावे, अशी मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावाही केला जात होता.

आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे २०२० च्या शासन निर्णयाच्या तरतुदी पूर्ण करणारे परिपूर्ण प्रस्ताव मागितले आहे. शासन निर्णयानुसार हे प्रस्ताव तपासून त्यावर योग्य ती कार्यवाही करणार असल्याची माहिती समजते.