समाजकंटकांवर कठोर कारवाईचे निर्देश

समाजकंटकांवर कठोर कारवाईचे निर्देश

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

येत्या 3 मे रोजी एकाच दिवशी मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान ईद ( Ramjan Eid Festival ) व हिंदू बांधवांचा साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षयतृत्तीयेचा सण ( Akshay Trutiya Festival )साजरा होणार असून दोन्ही सण शांततेत व उत्साहात साजरे करत शहरातील एकात्मतेचे वातावरण कायम राखावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.

आगामी रमजान ईद व अक्षय्यतृत्तीयेच्या पार्श्वभूमीवर पोलीस नियंत्रण कक्षाच्या सुसंवाद सभागृहात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची आढावा बैठक झाली. व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी कोणतेही गालबोट लागू न देता सण-उत्सव शांततेत साजरे करून हिंदू-मुस्लीम ऐक्य अबाधित राखण्याचे आवाहन केले. समाज माध्यमांवर कुठल्याही प्रकारच्या अफवा व चुकीचे संदेश पसरविणार्‍यांवर सायबर सेल लक्ष ठेऊन आहे. समाजकंटकांवर कठारे कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आततायीपणा करू नका, समाज माध्यमांवर अफवा व चुकीचे संदेश पाठवून कठोर कारवाईचे धनी होऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला.

रमजान ईदनिमित्त शहरातील 14 ईदगाह मैदानांवर नमाज पठण केले जाणार असून त्याठिकाणी मनपातर्फे साफसफाई करण्यात आली असून पिण्याचे पाणी, अतिक्रमण निर्मुलन, पथदीप, रस्त्यांची दुरूस्ती आदी सुविधांची कामे करण्यात येत असल्याची माहिती मनपा आयुक्त गोसावी यांनी यावेळी दिली. नमाज पठण होणार्‍या ईदगाह मैदानांवर पोलीस प्रशासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून ड्रोन कॅमेर्‍यांचीही तेथील हालचालींवर नजर राहणार आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल.

समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर असून जनतेने सण-उत्सव शांततेत साजरे करावेत, असे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक खांडवी यांनी केले. यावेळी प्रांत शर्मा यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस केवळ हिरे, कैलास तिसगे, प्रमोद शुक्ला, शफिक राणा, अ‍ॅड. हिदायतुल्ला, मौलाना कय्युम, माधवराव जोशी, मधुकर केदारे आदींसह शांतता समितीचे सदस्य व शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.