
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
द्राक्षमाल व्यवहार करणारे व्यापारी व शेतकरी यांच्यातील व्यवहार कायद्याच्या चौकटीत राहूनच झाले पाहिजेत. दरवर्षी होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकाराला आळा बसविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाईल. तसेच फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी कठोर पाऊले उचलली जातील, असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक बी. जी.शेखर यांनी दिला आहे...
निफाड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात आयोजित पोलिस प्रशासन, द्राक्ष बागायतदार संघ ,बाजार समिती प्रतिनिधी बैठकित ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी देशांतर्गत व देशाबाहेरील द्राक्षमाल व्यवहारात होणारी फसवणुकीबाबत मत मांडत पोलिस प्रशासनाकडुन द्राक्ष बागायतदारांचे प्रबोधन करावे, व्यापारी वर्गाची माहिती, पायलट, सर्व्हीस प्रोव्हाईडर यांची माहिती नोंदविण्याची मागणी केली तर द्राक्ष बागायतदारांचे द्राक्षमाल व्यवहार हे कायद्याच्या चौकटीत येण्यासाठी सौदा पावतीचा मसुदादेखील मांडण्यात आला.
याबाबत जानेवारी महिन्यातच द्राक्ष बागायतदारांचा प्रबोधन महामेळावा घेऊन त्याबाबत जागृती केली जाईल,असेही शेखर यांनी स्पष्ट केले. यावेळी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, निफाडचे पोलीस उपाधिक्षक सोमनाथ तांबे, द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय संचालक अँड रामनाथ शिंदे, लासलगांव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सचिव संजय लोंढे, लासलगांव बाजार समितीचे सह सचिव प्रकाश कुमावत, अँड शेखर देसाई, उमेश पारिख आदी उपस्थित होते.