आयुक्तांकडून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

अधिकारी, सेवकांना दिल्या सूचना
आयुक्तांकडून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

नाशिकरोड । प्रतिनिधी

मनपा आयुक्त कैलास जाधव व पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी नाशिकरोडमधील प्रतिबंधित क्षेत्रांची संयुक्तरीत्या पाहणी करून या प्रतिबंधित क्षेत्रात विविध कामांच्या सूचना मनपा व पोलीस प्रशासनाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

नाशिक शहरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत त्या ठिकाणी छोटे व मोठे प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी करण्यात आलेल्या नियोजनाबाबतची पाहणी मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केली. यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला

तसेच या ठिकाणी काम करत असलेल्या आशा सेविका, वैद्यकीय पथक व पोलीस पथकाशी चर्चा केली. या ठिकाणी असणारे रुग्ण व परिसरात रहिवाशांची अँटिजेन व आरटीपीसीआर तपासणी तसेच या चाचण्या वाढवणे, होम आयसोलेशन फॉर्म भरून घेणे, प्रतिबंधित क्षेत्राच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सर्व प्रतिबंधित क्षेत्रात रहिवाशांना दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, प्रतिबंधित क्षेत्रातील रस्ते बॅरिकेडिंग टाकून बंद करण्याची व्यवस्था करावी. तसेच प्रतिबंधित क्षेत्राच्या परिसरातील फलकावर संपर्क क्रमांक, प्रतिबंधित क्षेत्राचा प्लॅन आदी माहिती लावण्याच्या व्यवस्था तातडीने करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

नाशिकरोड विभागातील वरदहस्त अपार्टमेंट, आयोध्या नगरी व हार्मोनी बिल्डिंग, उपनगर, वसंतदीप सोसायटी जेलरोड, पंचवटीतील ब्रह्माणी पार्क, महाराष्ट्र कॉलनी येथील प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, मनपा उपायुक्त प्रदीप चौधरी, करुणा डहाळे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, विभागीय अधिकारी मयूर पाटील, महेंद्रकुमार पगारे, नितीन नेर, स्वप्नील मुदलवाडकर, डॉ.दिलीप मेणकर, करोना कक्षप्रमुख डॉ.आवेश पलोड, डॉ.विजय देवकर, डॉ. जगताप, डॉ. जितेंद्र धनेश्वर, पोलीस निरीक्षक अशोक भगत, विजय ढमाले, उपअभियंता जितेंद्र पाटोळे आदी अधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com