पळसे : प्रतिबंधित क्षेत्राची तहसीलदारांकडून पाहणी
नाशिक

पळसे : प्रतिबंधित क्षेत्राची तहसीलदारांकडून पाहणी

आरोग्य विभागाला सूचना

Abhay Puntambekar

देवळाली कॅम्प । वार्ताहर

पळसे येथील शिवाजी उद्यान व चौधरी बिल्डर्स कॉलनीत करोनाचा संसर्ग झाला असून पाच दिवसांपूर्वी याठिकाणी चार रुग्ण आढळून आल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. नाशिकचे उपविभागीय अधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार अनिल दौंडे व तालुका आरोग्य अधिकारी भोये यांनी अचानक भेट देत प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आरोग्य विभागाला कडक सूचना दिल्या.

ग्रामीण भागात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले असून पळसे येथे भेटी दरम्यान अधिकारी यांनी मास्क नसल्याचे आढळून आलेल्यांवर गुन्हे दाखल करा, तसेच करोनाला घाबरून न जाता सुरक्षा बाळगणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कुमार आशीर्वाद यांनी प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांनी विनाकारण फिरू नये, अशा सूचना केल्या.

सद्यस्थितीत एखादा आजार असल्यास त्या व्यक्तीची विशेष नोंदणी करून काळजी घेण्यास सांगुन सर्वेक्षण व्यवस्थित करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले. तर आरोग्य विभाग व आशा स्वयंसेविकांनी केलेल्या सर्वेक्षणात कुठल्याही प्रकारची सविस्तर माहिती न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. विचारलेल्या प्रश्नांची कुठल्याही प्रकारे माहिती नसल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा स्तरावरुन केलेल्या सर्वेक्षणात आढावा घेण्यासाठी एक टीम नियुक्त करुन काही चुकीचा सर्वे आढळल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत कुमार आशीर्वाद यांनी दिले.

यावेळी सरपंच अजित गायधनी, मंडल अधिकारी घोडके, तलाठी जी.एच. भुसारे, नवनाथ गायधनी, दिपक गायधनी, साहेबराव गायधनी, रवींद्र सरोदे, दुर्गादास चारस्कर, ग्रामविकास अधिकारी उत्तम शेटे, आरोग्य अधिकारी सतिष अहिरराव, आरोग्य सेवक पैठणे आदींसह सदस्य उपस्थित होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com