वेलनेस सेंटरच्या प्रस्तावित जागांची पाहणी

केंद्रीय अधिकार्‍यांच्या विशेष पथकाचा दौरा
वेलनेस सेंटरच्या प्रस्तावित जागांची पाहणी

नाशिकरोड । प्रतिनिधी

खा.हेमंत गोडसे ( MP Hemant Godse ) यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वेलनेस सेंटर (wellness center )उभारणीच्या प्रस्तावाला मागील महिन्यात केंद्रसरकारने मान्यता दिलेली आहे . वेलनेस सेंटर उभारणीच्या कामाला आता प्रारंभ होणार असून केंद्रीय अधिकार्‍यांच्या एका विशेष पथकाने नाशिक येथे दौरा करत प्रस्तावित जागांची पाहणी केली.

या अधिकार्‍यांच्या पथकामध्ये एका उच्च पदस्थ अधिकार्‍यासह तिघांचा समावेश होता. प्रस्तावित चारही जागा गांधीनगर आणि नेहरूनगर परिसरातील असून लवकरच या ठिकाणच्या निश्चित जागेवर वेलनेस सेंटर प्रत्यक्ष सुरू होणार आहे. यामुळे येत्या तीन महिन्यानंतर प्रत्यक्ष सुरू झालेल्या वेलनेस सेंटरचा लाभ नाशिक जिल्हयासह उत्तर महाराष्ट्रातील सुमारे एक लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांना होणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात केंद्रशासनाच्या सेवेतील अधिकारी, कर्मचारी आणि पेंशनधारक कुटुंबियांची संख्या सुमारे 35 हजार इतकी असून त्यांच्या कुटूंबियांसह लाभार्थीची संख्या जवळपास लाखभर आहे. केंद्रशासनाच्या सेवेतील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सीजीएचएस या आरोग्यविषयक योजनेचा लाभ घेण्यासाठी नाशिक येथे वेलनेस सेंटर नसल्याने त्यांना मुंबई, पुणे येथे उपचारासाठी जावे लागत होते. त्यामुळे रूग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता

या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नाशिक येथेच सीजीएचएस चे वेलनेस सेंटर व्हावे यासाठी गेल्या काही वर्षापासून खा. गोडसे प्रयत्नशील होते. मागील महिन्यात गोडसे यांच्या प्रयत्नांना यश येवून केंद्रशासनाने नाशिक येथे वेलनेस सेंटरला अखेर मान्यता दिली आहे.

वेलनेस सेंटर नेमके कोणत्या जागेवर सुरू करायचे या विषयी प्रशासन पातळीवर निर्णय अद्याप झालेला नसून यासाठी प्रस्तावित जागांची पाहणी करण्यासाठी आज केंद्रशासनाचे विशेष पथक नाशिक दौर्‍यावर आले असून या पथकामध्ये सीजीएचएसचे नोडल ऑफिसर डॉ.निर्मल मंडल, अरूण महाजन, डॉ.अमोल अस्कर यांचा समावेश होता.

या पथकाने आर्टिलरी स्टॅटेस्टिक वर्कशॉप सिविल अँण्ड ऍम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष मनोज बागुल, यु.एन. नागपुरे, गांधीनगर प्रेसचे कामगार युनियनचे अध्यक्ष राम हारक, रवी आवारकर यांच्यासह गांधीनगर येथील भाजीबाजार समोरील प्रेस क्लिनिक आणि गांधीनगर मराठी शाळा या दोन जागांची पाहणी केली.

पाहणीनंतर पथकातील अधिकार्‍यांना गांधीनगर प्रेसचे प्रभारी अधिकारी राम दयाळ यांच्यासोबत जागा हस्तांतराविषयी चर्चा केली. त्यानंतर पथकाने प्रेस कामगार युनियनचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, संतोष कडाळे या कामगार नेत्यांच्या सोबत नेहरूनगर येथील प्रेस रूग्णालयाच्या पाठीमागील सीएमओ बंगला आणि नर्सेस होस्टेल या दोन जागांची पाहणी केली.

पाहणी दौरा आटोपल्यानंतर पथकाने प्रेस कामगारांच्या नेत्यांसह प्रेसचे डीजीएम अशिष अविनाशी यांची भेट घेवून जागा उपलब्धतेविषयी संवाद साधला. वरील चारही ठिकाणच्या जागा वेलनेस सेंटर सुरू करण्यासाठी सोयीसुविधायुक्त असून खा. गोडसे यांच्याशी चर्चा करून लवकरच जागा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सीजीएचएसचे नोडल ऑफिसर डॉ.निर्मल मंडल यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com