
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमांतर्गत कार्यरत धर्मादाय रुग्णालयांना एकूण क्षमतेच्या 10 टक्के खाटा समाजातील निर्धन व दुर्बल रुग्णांसाठी राखीव ठेवत त्यांना उपचार देणे बंधनकारक असते. प्रत्यक्षात या रुग्णालयांकडून ही सुविधा पुरविली जाते. किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी धर्मादाय (Charity) सहआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली धर्मादाय रुग्णालयांची (Charitable hospitals) तपासणी करण्यात आली.
गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांना दिलेल्या उपचारांची गुणवत्ता, दर्जा व आजाराप्रमाणे अपेक्षीत चाचण्या व उपचार झाले आहेत किंवा नाही याची तपासणी, समितीचे अध्यक्ष धर्मादाय सहआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या समितीद्वारे रुग्णालयांची त्रैमासिक तपासणी करण्यात येत असते.
धर्मादाय सहआयुक्त (Joint Commissioner) हे तपासणी समितीचे पदसिध्द अध्यक्ष असून सहायक संचालक, आरोग्य सेवा हे पदसिद्ध सचिव असतात. त्यानुसार नुकताच डॉ. वसंत पवार धर्मादाय रुग्णालय (Dr. Vasant Pawar Charitable Hospital) आडगाव, व सप्तशृंगी आयुर्वेद धर्मादाय रुग्णालय, (Saptshringi Ayurveda Charitable Hospital) नाशिक यांची तपासणी करण्यात आली.