करोना केंद्राची आयुक्तांकडून पाहणी

करोना केंद्राची आयुक्तांकडून पाहणी

सातपूर । प्रतिनिधी Satpur

करोनाच्या ( Corona ) संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिका व नाशिक मधील विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणार्‍या अंबड आयटी कोविड हेल्थ केअर सेंटरची ( Ambad-IT- Covid Center ) पाहणी महापालिका आयुक्त कैलास जाधव ( NMC Commissioner Kailas Jadhav )यांनी करून विविध प्रकारच्या सूचना दिल्या.

नाशिकमधील विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणार्‍या अंबड आयटी कोविड हेल्थ केअर सेंटरसह संभाजी स्टेडियम व ठक्कर डोम येथील ऑक्सिजन बेड तयार करण्याबाबत व तेथे सुरू होणार्‍या ऑक्सिजन प्लांटच्या कामाची पाहणी करून ऑक्सिजन प्लांटची क्षमता व इतर बाबींची माहिती आयुक्त जाधव यांनी घेतली.या माध्यमातून किती ऑक्सिजन बेड वाढवता येतील याचा सविस्तर आढावा घेतला.

संभाव्य तिसर्‍या लाटेकरिता नाशिक महानगरपालिकेतर्फे अतिरिक्त ऑक्सिजन बेडचे नियोजन करण्यात आलेले असून सर्व काम महिनाअखेर पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले. अंबड आयटी येथील कोविड हेल्थ केअर सेंटर करिता विविध कंपनीमार्फत सीएसआर मधून रुग्णालयीन साहित्य व सामग्री प्राप्त होणार असल्याची माहिती आयमाच्या वतीने देण्यात आली.

या ठिकाणी महिंद्रा अँड महिंद्रा, जिंदाल व टी. डी. के. या तीन कंपन्यांच्या माध्यमातून अंबड येथील कोविड हेल्थ केअर सेंटरकरिता तीन ऑक्सीजन प्लांट उपलब्ध करण्यात आलेले असून हे प्लांट कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. त्याची पाहणी देखील आयुक्त जाधव यांनी करून तेथील कार्यपद्धती समजून घेतली.

अंबड येथील सेंटरमध्ये 300 ऑक्सिजन बेडसह एकूण 500 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच ठक्कर डोम येथे एकूण 325 ऑक्सिजन बेडचे नियोजन करण्यात येणार आहे. संभाजी स्टेडियम येथे 180 ऑक्सिजन बेडसह एकूण 380 बेडचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आयुक्त जाधव यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, एस. ई. बच्छाव, आर. एस. पाटील, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, मयूर पाटील तसेच एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी आयमाचे उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र अहिरे, राजेंद्र पानसरे, गोविंद झा, राजेंद्र कोठावदे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com