कोविड केअर सेंटरची पाहणी

कोविड केअर सेंटरची पाहणी

लासलगाव । वार्ताहर

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने आता मनुष्य वाचविण्यासाठी ही संकटाची लढाई असून खासगी डॉक्टर, नर्स व स्वयंसेवी संस्थानी या लढ्यात उतरावे, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला दौर्‍यावर असतांना भुजबळ यांनी विंचूर व लासलगाव येथील कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांशी संवाद साधला. रुग्णांना योग्य प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात की नाही याची खातरजमा करत रुग्णांची चौकशी केली.

यावेळी त्यांचा समवेत तहसीलदार शरद घोरपडे, पोलीस निरीक्षक राहूल वाघ, पं. स. सदस्य संजय शेवाळे, लासलगाव सरपंच जयदत्त होळकर, विंचूर सरपंच सचिन दरेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र भवर, आदी उपस्थित होते. विंचूर येथे उभारण्यात आलेल्या खासगी कोविड केअर सेंटरची पाहणी करत डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन तेथील सध्या तेथे 30 खाटा व 10 ऑक्सिजन बेडस वाढविण्याच्या सूचना दिल्या.

लासलगाव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल व बायपास रस्त्याची पाहणी केली. सदर रस्त्याचे व उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. तसेच भूसंपदानाबाबत शेतकर्‍यांच्या अडचणी दूर करून घ्याव्यात असे आदेश त्यांनी दिले.

ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळत मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. शक्य असल्यास घराबाहेर पडावे अशा सूचनाही भुजबळांनी केल्या. यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर पक्षाचे पदाधिकार्‍यांनी विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com