पंचवटी | वार्ताहर

नाशिक जिल्ह्यातील १३ बाजार समित्यांची दोन वर्षांची दप्तर तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पथकांची नियुक्ती करीत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. ही तपासणी नियमित असून, तो कामकाजाचा भाग असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले आहे...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह सटाणा, नामपूर, देवळा, उमराणे, मालेगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, दिंडोरी, नांदगाव, मनमाड, घोटी, लासलगाव या बाजार समितीतील १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतीतील कामकाजाची तपासणी करण्यासाठी ५० अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे.

या पथकाने दि. १० ते १२ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत संबंधित बाजार समितीच्या दप्तराची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश व परिपत्रके तसेच, वरिष्ठ कार्यालयाने दिलेले निर्देश यांचे पालन करून त्यानुसार कामकाज चालते किंवा नाही याची खातरजमा करणे आवश्यक असल्याने बाजार समितीच्या कामकाजाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.

बाजार समितीस प्राप्त अधिकार, कर्तव्य व शक्तीचा वापर बाजार समिती योग्यरित्या करीत आहे का ?, इ – नाम अंतर्गत बाजार समितीने केलेले कामकाज, बाजार समिती आवारात बाजार घटकास सोयी-सुविधा, सुरक्षा उपलब्ध आहे का ? बाजार फी, देखरेख खर्च, पणन मंडळ अंशदान नियमित वसूल होते का ?,

बाजार समितीस प्राप्त मंजुरी पत्रातील अटी शर्तींची पूर्तता केली का ?, शेतकरी वर्गाचे हक्क सुरक्षित आहे का?, बाजार समिती संचालक मंडळाचे कामकाज कायदा, नियम व उपविधीतील तरतुदीनुसार चालते का?, शेतकऱ्यांच्या शेतमालास स्पर्धात्मक दर मिळावे यासाठी बाजार समितीने केलेले प्रयत्न, बाजार आवारात शासकीय खरेदी केंद्र आहे का?,

असल्यास त्याकरिता बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा, तपासणी कालवधीत बाजार समिती कामकाजाबाबत प्राप्त तक्रार अर्जावर बाजार समितीने केलेली कारवाई, बाजार समितीने शासनाचे, पणन संचालनालयाने, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग या कार्यालयाने काढलेले आदेश,

परिपत्रक व निर्देशांचे पालन केले आहे का? लायसन्स देताना बाजार समितीने कायदा, नियम व उपविधीतील तरतुदीनुसार नियोजन केले आहे का?, बाजार समिती अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणुका नियमानुसार करण्यात आल्या का?,

बाजार समिती सचिव त्यास प्राप्त शक्तीचा व कर्तव्याचे पालन करतो का?, तपासणी दरम्यान आढळून आलेल्या अन्य नियमबाह्य बाबी यांची माहिती या तपासणीत करण्यात येणार आहे.