जलजीवन मिशन अंतर्गत केंद्रीय पथकाची पाहणी

जलजीवन मिशन अंतर्गत केंद्रीय पथकाची पाहणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जलजीवन मिशन ( Jal Jivan Mission ) अंतर्गत अंमलबजावणी व गुणवत्तेबद्दल केंद्रस्तरीय पथकाकडून नाशिक जिल्ह्यातील 7 गावांची पाहणी करण्यात आली. या भेटीत गावातील कुटुंबस्तरावरील नळजोडणी, पाणीपुरवठा योजना, पाणी गुणवत्ता या बाबत पडताळणी करण्यात आली. दरम्यान, चांदवड तालुक्यातील सुतारखेडे गावातील कामांबाबत पथकाने समाधान व्यक्त करत कौतूक केले.

देशातील प्रत्येक कुटुंबाला घरगुती स्तरावर नळाव्दारे नियमित, शुध्द व 55 लिटर प्रतिमाणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशनची सुरुवात केलेली आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महसुली गावातील 100 टक्के कुटुंबांना नळ जोडणी देऊन 55 लिटर प्रतिमाणसी शुध्द व शाश्वत पाणी पुरवठा करावयाचा आहे. तसेच गावातील सर्व शाळा, अंगणवाडी, संस्था, सार्वजनिक ठिकाण यांना नळाव्दारे पाणी पुरवठा करावयाचा आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचे काम सुरु आहे.

जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावाणी कशाप्रकारे करण्यात येत आहे. याबाबत गाव पातळीवर भेटी देऊन अभिप्राय मिळविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल स्वच्छता व गुणवत्ता, कोलकत्ता यांनी तज्ञ सल्लागारांची नियुक्ती केली आहे. या पथकामध्ये राष्ट्रीय जलजीवन मिशन सल्लागार नवीन पुरी व गजनफर अहमद यांचा समावेश असून त्यांच्यामार्फत नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यातील खडक माळेगाव, शिंपी टाकळी, पिंपरी व श्रीरामपूर तर चांदवड तालुक्यातील सुतारखेडे, हिरापूर व जोपूळ गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाणी पुरवठा विषयक विविध बाबींची पडताळणी करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने कुटुंबस्तरावर केलेली नळजोडणी, पाणी पुरवठा योजना, पाण्याचे वितरण, पाणी गुणवत्ता, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गावात सुरु असलेली जनजागृती, लोकसहभाग, शाळा व अंगणवाडीमधील नळजोडणी आदि घटकांची पडताळणी करण्यात आली. या पथकामार्फत एकत्रित करण्यात येणारी माहिती राष्ट्रीय जल जीवन मिशन, नवी दिल्ली यांना सादर करण्यात येणार आहे. या पथकासोबत पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील, उपअभियंता (ग्रापापु) रविंद्र महाजन, विस्तार अधिकारी (ग्राप) सुनिल पाटील, जिल्हा कक्षातील संतोष धस, भाग्यश्री बैरागी, संदीप जाधव, अमोल नगरे, गट समन्वयक धनराज सुरवसे आदि उपस्थित होते.

सुतारखेडे गावाचे कौतूक

केंद्रस्तरीय समितीने आज चांदवड तालुक्यातील सुतारखेडे, हिरापूर व जोपूळ या गावांना भेट दिली. सुतारखेडे गावामध्ये राबविण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेबाबत त्यांनी समाधान व्यक्त करुन अभियंत्याचा विशेष सन्मान पथकाने केला. सुतारखेडे गावात 100 टक्के नळजोडणी करण्यात आली असून ग्रामस्थांना शुध्द व नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणी गुणवत्तेबाबतही गावामध्ये उत्तमप्रकारे काम करण्यात येत असून जलसुरक्षक तसेच गावातील पाच महिला यांच्यामार्फत या कामाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. शाळा व अंगणवाडी नळजोडणी, शाळेत करण्यात आलेले रेन वॉटर हार्वेस्टिंग, हॅन्ड वॉश स्टेशन, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत यांची पाहणी करण्यात आली. एकुणच गावातील कामाबाबत तसेच लोकसहभागाबाबत पथकाने गावाचे कौतुक केले. यावेळी सरपंच सौ वर्षा गांगुर्डे,उपसरपंच वाल्मीक वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com