आश्रम शाळेतील शिक्षकाचा ‘रविवारचा विरंगुळा’...

नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम; ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद
अनौपचारिक शिक्षण
अनौपचारिक शिक्षण

वेळुंजे । Velunje

नाशिक येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक नितीन प्रभू केवटे प्रत्येक रविवारी मुलांना वर्गाबाहेरचे अनौपचारिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी 'रविवारचा विरंगुळा' या आदर्श शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात केली. शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया चार भिंतीच्या बंदिस्त खोलीत पूर्णत्वास येऊ शकत नाही. शिक्षण हे सहज निरीक्षणातून व कृतीतून घडते आणि समृद्ध होते.

अनौपचारिक शिक्षणात व्यवसाय शिक्षण व जीवन शिक्षण देण्यासाठी मुलांच्या साह्याने शाळेत सिमेंटचा १२ x १४ फूट जागेवर ३ फूट उंच असा मजबूत किल्ला उभारला, सिंटेक्सच्या टाकाऊ टाकी पासून शौचालय निर्मिती, झाडाला सिमेंटचे चबुतरे, जुन्या लाईटच्या खांबाचा उपयोग करून हँडबॉल व व्हॉलीबॉल कोर्टची निर्मिती, शाळेतील टाकाऊ बँडच्या पत्र्यापासून घड्याळ व संख्यावाचन शैक्षणिक साहित्याची निर्मिती, गावातील भजनी मंडळाचा कार्यक्रम, मातीकाम, माळीकाम प्रशिक्षण, गावच्या पाणवठ्याला भेट, पोष्ट ऑफिसला भेट, पुठ्यापासून मानवी सांगाडा, सोलर प्लेटवर गवत कटर मशीन, बॅटरीवर चालणारा झुरळ रोबोट, संगणक संग्रहालय, मोटारसायकलचे सुट्टे भाग करून बेसिक मेकॅनिकल प्रशिक्षण, चंद्रयानाची ५ फूट उंच अशी प्रतिकृती, स्वखर्चाने लेझीम पथक व वाचनालयाची निर्मिती. शाळेत असे विविध उपक्रम प्रत्येक रविवारी राबविण्यात येतात.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या उपक्रमाची मोलाची मदत होत आहे. या उपक्रमांची दखल घेत 'सर फाऊंडेशन सोलापूर' यांचा राज्यस्तरीय नवोपक्रमशील पुरस्कार, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचा 'नेत्रदीपक पुरस्कार, कृतिशील शिक्षक समूह, महाराष्ट्र शिक्षक पॅनल, युवा ध्येय उद्योग समूह व डायट, नाशिक यांनी सन्मानित केले आहे.

नितीन प्रभू केवटे यांचा हा उपक्रम शैक्षणिक विश्वातील खरोखरच अनोखा ठरला असून त्यांच्या उपक्रमाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे मुख्य संपादक आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

नितीन प्रभू केवटे यांच्या नावावर नोंदवल्या गेलेल्या या विशेष राष्ट्रीय विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नितीन प्रभु केवटे यांनी ,गेल्या चार वर्षात या शाळेचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून महाराष्ट्रातील एक अग्रगण्य म्हणून ही शाळा नावारुपाला आली असून शाळेतील प्रत्येक विधार्थाचे अनेक गुण हे त्यामधील वैभव आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com