मेमू रेल्वेला थांबा नसल्याने नांदगावकरांवर अन्याय

मेमू रेल्वेला थांबा नसल्याने नांदगावकरांवर अन्याय

नांदगाव । प्रतिनिधी

भुसावळ-पुणे दरम्यान येत्या 6 तारखेपासून मेमू रेल्वे सुरू होणार असून या गाडीला देखील नांदगाव स्थानकात थांबा देण्यात आला नसून रेल्वेकडून पुन्हा नांदगावकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. परंतु देशभर मजुरांचे स्थलांतर सुरू झाल्यानंतर सरकारने स्पेशल रेल्वे चालू करण्यास परवानगी दिल्यानंतर रेल्वेने करोना स्पेशलच्या नावाखाली केवळ आरक्षित रेल्वे चालू केल्या होत्या. परंतु या रेल्वे चालू करत असतांना नांदगाव स्थानकात थांबत असलेल्या गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते.

यामुळे येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यासंदर्भात नांदगावकरांनी नांदगाव बंद करून मोर्चा देखील काढण्यात आला होता. या मोर्चाला सामोरे जाताना स्थानिक खा. भारती पवार यांनी दोन ते तीन गाड्यांचे थांबे काही दिवसात मिळवून देण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. परंतु याउपरही कोणत्याच गाडीला थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील जनतेची मोठी गैरसोय निर्माण होत आहे.मध्य रेल्वे भुसावळ विभागामार्फत भुसावळ ते पुणे दरम्यान मेमू रेल्वे सुरू करण्यात येणार असून येत्या 6 मेपासून दर गुरुवारी ही गाडी चालवण्यात येणार आहे.

संपूर्णपणे आरक्षित असणार्‍या या गाडीला देखील नांदगाव येथे थांबा देण्यात आलेला नसल्यामुळे रेल्वेने पुन्हा नांदगावकरांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. नांदगावकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यात येत आहे. नांदगाव येथून पुण्याला जाण्यासाठी सकाळी झेलम एक्स्प्रेस असायची परंतु त्या गाडीचा देखील थांबा बंद करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी दिवसा गाडीच नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामध्ये पैसा आणि वेळ देखील वाया जात आहे. यामुळे या गाडीला नांदगाव रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी नांदगावकरांनी केली आहे.

रेल्वे प्रशासनाला निवेदन देणार

दि. 6 मे गुरुवार रोजी भुसावळ ते पुणे ही गाडी दर गुरुवारी मेमू ट्रेन धावणार असल्याचे परिपत्रक भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आले असून मेमू ट्रेनला इतर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला असून नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबा रद्द करण्यात आला आहे. लवकरच या संदर्भात रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असल्याचे रेल्वे सल्लागार समितीचे अध्यक्ष तुषार पांडे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com