सुविधांसाठी संस्था, नगरसेवक सरसावले

करोना बाधीतांना मिळणार दिलासा
सुविधांसाठी संस्था, नगरसेवक सरसावले
करोना

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात वाढता करोना संसर्गामुळे महापालिका वैद्यकिय यंत्रणा अपुरी पडत असल्याने बाधीतांना खाटा मिळणे अवघड झाले आहे. यात ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडअभावी मृत्युच्या घटना समोर येत असल्याचे एक भीषण वास्तव समोर आले आहे. या गर्दीत सर्वसामान्य व गरीब कुटुंबाचे जीवन रामभरोसेे झाल्याचे दिसत आहे. या एकुण भयावह स्थितीत आता नगरसेवकांनी आपला निधी याकामी वापरण्यास संमती दिली असून काही संस्था, नगरसेवकांनी सामाजिक दायीत्व म्हणून कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरू केले असल्याने यातून बाधीतांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महपालिका क्षेत्रात मार्च नंंतर एप्रिल महिन्यात करोनाने हाहाकार घातला आहे. दररोज सुमारे अडीच हजार नवीन रुग्ण समोर येत असल्याने रुग्ण व खाटांची सांगड घालणे अशक्य असल्याचे चित्र समोर आले आहे. खाटांसाठी प्रतिक्षा यादी तयार झाल्यानंतर गंभीर बाधीतांंना दिवस मोजावे लागत आहेत. तर खाटा मिळत नसल्याने रुग्ण घरीत थांबत असल्याचे भीषण चित्र निर्माण झाले असल्याने आता महापालिका प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेलेली स्थिती सावरण्यासाठी खाजगी संस्था, नगरसेवक व काही डॉक्टर पुढे आले आहेत.

यात मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी ऑक्सीजन खाटांपासून वंचित राहत असलेल्या रुग्णांना घरी उपचार घेता यावेत म्हणून ऑक्सिजन बँक तयार करुन त्याद्वारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रे्टर देण्याची व्यवस्था केली. या बोरस्ते यांच्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केल्यानंतर आता अनेक नगरसेवकांनी पुढे येत आपला निधी याकरिता खर्च करण्याची संमती प्रशासनाला दिली. यामुळे आता महापालिकेने नगरसेवक निधीतून हवेतील प्राणवायू रुग्णास देणारी तब्बल 1250 यंत्रे अर्थात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रे्टरफ खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे.

प्रत्येक नगरसेवकाच्या निधीतून प्रत्येकी 10 याप्रमाणे 125 नगरसेवकांच्या निधीतून 1250 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर महापालिका प्रशासनाला उपलब्ध करता येणार आहेत. सर्वसाधारणपणे 30 हजार रुपये किंमतीचे हे यंत्र असून सर्वसाधारण खाटेवर ते रुग्णांसाठी उपयोगात आणता येते. अशाप्रकारे 1250 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रे्टर मशिन खरेदी करण्यासाठी सुमारे 35 ते 40 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या उपकरणाची मागणी तातडीने नोंदवून पुढील काही दिवसांत ती उपलब्ध करण्याच्या हालचाली मनपा प्रशासनाकडुन सुरु करण्यात आल्या आहेत.

तसेच आता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संबंधीत भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी कॉग्रेस, समता परिषद, मनपातील माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्या पुढाकाराने आता करोना बाधीतांना तात्काळ खाटा उपलब्ध व्हाव्यात म्हणून कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे काम सुरू करुन काही सेंटर सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात खाटा आता बाधीतांसाठी उपलब्ध होणार आहेत. अशाप्रकारे पुढच्या काळात सामाजिक दायीत्व म्हणुन काही व्यक्ती, संस्था, संघटनां अशाप्रकारे करोना बाधीतांना सढळ मदतीसाठी पुढे आल्यास बाधीतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com