
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाफेडकडून 15 मेपासूनच प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू केली जाईल, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या भेटीनंतर जाहीर केले होते. अशा आशयाचे वृत्तही मागील आठवड्यात प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. प्रत्यक्षात मात्र नाफेडकडून अजून महाराष्ट्रात कुठेही कांदा खरेदी सुरू झालेली नसून नाफेडची प्रत्यक्ष कांदा खरेदी का सुरू होत नाही, याचा खुलासा डॉ.पवार यांनी करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
नाफेड कांदा खरेदीबाबत अजून कोणतीही स्पष्टता नसून बाजार समितीमध्ये शेतकर्यांच्या कांद्याला सरासरी दोन रुपयांपासून सहा रुपये प्रति किलोचा नीचांकी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून शेतकर्यांमध्ये सरकारबद्दल प्रचंड संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत. स्वतः केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी एप्रिल महिन्यातच नाफेडकडून यावर्षी तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केली जाईल, असे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले होते.
स्वतः केंद्रीयमंत्र्यांनी नाफेड कांदा खरेदीबाबत घोषणा करुनही प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू होत नाही. हे शेतकर्यांची फसवणूक करण्यासारखे आहे. केंद्रीय मंत्र्यांनी शेतकर्यांच्या संयमाचा अंत बघू नये. अतिवृष्टी, गारपीट अवकाळी पावसामुळे राज्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सध्या कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकर्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये नाफेडकडून कांदा खरेदी सुरू होणे अत्यंत गरजेचे असून नाफेडने ही कांदा खरेदी थेट बाजार समितीमध्ये उतरुन करावी व्यापारी खरेदी व नाफेडच्या खरेदीमध्ये स्पर्धात्मक लिलाव होऊन शेतकर्यांना अधिकचा दर कसा मिळेल. यासाठीही डॉ. भारती पवार यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.